मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मांडलेली ठाकरे सरकारविरोधी भूमिका, त्यानंतर दुस-याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट, या वेगवान घडामोडींमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या आहेत. यावर अनेक तर्क-वितर्क मांडण्यात येत असताना सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीबाबत मोठं विधान केलं आहे.
येत्या काळात माझी आणि राज ठाकरेंची भेट झाली तर त्यात आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. या भेटीत युतीबाबत काय बोलायचं ते आम्ही ठरवणार आहोत, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
(हेही वाचाः गडकरींच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान)
भेट झाली तर आश्चर्याची गोष्ट नाही
राज ठाकरे आणि माझी भेट अजून ठरलेली नाही. पण आमच्या या भेटीत आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाही. आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत, त्यामुळे या भेटीत काही नवल नाही. राहिला प्रश्न युतीच्या चर्चेचा तर आता भेटल्यानंतर आम्ही काय बोलायचं ते ठरवू, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
वाट बघा, काय होईल ते कळेल
राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात. प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ हा त्या त्या वेळी निघत असतो. आता या युतीच्या संदर्भात आपण वाट बघितली पाहिजे. काय परिस्थिती निर्माण होईल ते आपल्या नक्कीच लक्षात येईल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
(हेही वाचाः वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणा-या सरकारसाठी संजय राऊत ‘जो’ शब्द वापरतात तोच वापरावा लागेल)
शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेसची झेड टीम?
राज ठाकरे यांनी एक भूमिका मांडली. कालपर्यंत जेव्हा त्यांची भूमिका ही त्यांच्या बाजूने होती तोपर्यंत त्यांना गुदगुल्या होत होत्या. पण आता त्यांनी विरोधात भूमिका मांडल्यानंतर ए टीम, बी टीम अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण शिवसेना नेमकी कुठली टीम आहे?, असा माझा सवाल आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाल्यानंतर काय मिळत आहे. मग ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झेड टीम म्हणायची का?, असा खोचक सवालही फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
Join Our WhatsApp Community