अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला संबंधित करताना उपमुख्यमंत्री अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य करीत होते; तेवढ्यात साहेबांचा फोन वाजला आणि फडणवीस भर पत्रकार परिषदेत थांबले. पण, उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यालाच ‘साहेब’ उपाधी देत चिमटा काढल्याचे दस्तुरखुद्दांच्या लक्षात येताच ते पुरते खजील झाले.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचे गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ )
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांनी चहापानाचे आयोजन केले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या संबोधनाने झाली. त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या पाच-सात मिनिटांत खाली बसलेल्या एका पत्रकाराचा फोन वाजला. काहींचे लक्ष तिकडे वळले. तसे फडणवीसांनीही तिकडे पाहिले. पण, हा बहाद्दर शांत बसला नाही. थेट पत्रकार परिषद सुरू असताना त्याने फोनवर तावातावाने बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे काहीसा अडथळा निर्माण झाल्याने उपमुख्यमंत्रीही थांबले. ‘साहेबांचा फोन झाला, की आपण बोलू’, असा टोमणा लगावताच तो पत्रकार खजील झाला. त्यामुळे सभागृहात काही काळ हशा पिकला.
सत्तेत असताना केले नाही, ती कामे आमच्याकडून अपेक्षित
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही चहापानासाठी विरोधी पक्षांना निमंत्रित केले होते. मात्र, नेहमीप्रमाणेच त्यांनी बहिष्कार टाकला आणि सात पानी पत्र पाठवले. यातील मधली चार पाने आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातील आहेत. त्यातील अक्षरे, शब्दांमध्येही फेरबदल केल्याचे दिसत नाही. हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की, ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ कार्यरत आहे त्यावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो. त्यामुळेच ते सत्तेत असताना जे-जे त्यांनी केले नाही, त्या सर्व अपेक्षा त्यांनी आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत. मी विरोधी पक्षांना आश्वस्त करू इच्छितो की, आमचे शिवसेना-भाजप युती सरकार त्यांच्या सर्व अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Join Our WhatsApp Community