कसबा पोट निवडणुकीत भाजपचा उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होत असून त्या ठिकाणी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय होणार आहे, हे दिसताच विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकर यांचे अभिनंदन करावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना केली, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना चांगलाच टोला हाणला.
काय म्हणाले नाना पटोले?
पुण्यातील कसबा येथील पोट निवडणुकीत काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ११ हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्याचीही जागा या सभागृहात करावी लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
(हेही वाचा आंध्र प्रदेश सरकार ३ हजार मंदिरे बांधणार; श्री तिरुपती देवस्थान प्रत्येक मंदिराला १० लाख रुपये देणार)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नाना पटोले यांचे अभिनंदन करावे लागेल, जसे कसब्याचा निकाल स्वीकारायचा तसे चिंचवडचाही निकाल स्वीकारावा लागेल. मुद्दा हा आहे की, जसे कसब्याचे आत्मचिंतन आम्हाला लागेल, तसे तुम्हालाही करावे लागणार आहे. तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस कुठे दिसतच नाही. तुमच्यावर ही वेळ आली की, एखादा उमेदवार निवडून आला तर सभागृहात उभे राहून सांगावे लागत आहे. त्यामुळे थोडे आत्मचिंतन तुम्ही करा, थोडे आम्ही करतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर?
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, नाना पटोले हे ११ महिने विधानसभा अध्यक्ष होते, त्यांना माहित आहे की, निवडून आलेल्या उमेदवाराचे पत्र निवडणूक आयोग विधिमंडळाला देईल, त्यानंतर आपण केलेल्या विनंतीनंतर योग्य जागा त्या उमेदवारासाठी सभागृहात जागा करण्यात येईल, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community