महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना जशासतसे उत्तर देऊ; फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा

130

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आज अवमानाचे राजकारण करीत आहेत. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी राजकारण करणाऱ्यांना जशासतसे उत्तर देऊ, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिला.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, आमचे सरकार आले नसते तर, याही वर्षी कोरोनाचे निमित्त करून अधिवेशन नागपुरात झाले नसते. अजित पवार यांना विरोधात बसल्यानंतर नागपूरची आठवण झाली. विदर्भातील हवेने प्रसन्न वाटल्यामुळे ते तीन आठवड्याचे अधिवेशन घेण्याची मागणी करत आहेत. त्यांना आणखी काही दिवस नागपुरात रहायचे असेल तर मुख्यमंत्री त्यांची मागणी निश्चित पूर्ण करतील.

फडणवीस म्हणाले, विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला, याचे आकडे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. विदर्भावर अन्यायाची मालिका उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुरू झाली. अनुसूचित जाती-जमातीच्या शिष्यवृत्ती जमा न झाल्याचा आरोप ते करत आहेत. पण हे त्यांच्या काळातील पाप आहे. आम्ही त्यांच्या काळातील थकीत शिष्यवृत्ती देण्याचे काम केले, हे ध्यानात घ्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

सीमावाद जाणीवपूर्वक पेटवल्याचे पुरावे!

सीमाप्रश्न आताच सुरू झाल्याचा आव हे लोक आणत आहे. पण इंटिलीजन्स रिपोर्टनुसार हा वाद जाणीवपूर्वक पेटवणारे कोण आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत. ती माहिती योग्यवेळी जाहीर करू, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या अधिवेशनात आम्ही विरोधकांना अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ, असेही ते म्हणाले.

राऊतांनी मराठा मोर्चाचे फोटो ट्विट केले

महाविकास आघाडीने काढलेल्या नॅनो मोर्चाला अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे हताश झालेल्या संजय राऊतांनी मराठा मोर्चाचे फोटो ट्विट करून जनतेची दिशाभूल केली, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.