विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, आज अमृता फडणवीस यांनी मुंबईतील विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना मुंबई महापालिकेवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी असा अजब दावा केला की, मुंबईतील अनेक जोडप्यांचे घटस्फोट होण्यामागचे कारण म्हणजे मुंबईतील वाहतूक कोंडी. या अनोख्या विधानामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गुरूवारी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेचा 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आज अमृता फडणवीस यांनी थेट महापालिकेवरच निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस
मी मुंबईतील समस्यांबाबत ट्विट करते. त्यावर बोलते. ते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी फडणवीसांची पत्नी आहे हे तुम्ही विसरून जा. मीही सामान्य नागरिक आहे. मीही घराबाहेर पडते. मलाही समस्यांचा सामना करावा लागतो. मलाही ट्रॅफिकच्या समस्यांना सामोरे जावे लागते, अशा शब्दात अमृता फडणवीसांनी पालिकेच्या कामकाजाचे वाभाडे काढले. यापुढे त्या असंही म्हणाल्या की, मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही.
(हेही वाचा – जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा फटका विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेवर!)
मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे
जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, स्वयंसेवक संघ आणि भाजप पुरोगामी असल्याचा दावा केला. भाजप-संघ पुरोगामी आहेत. ते स्त्रियांचा मान ठेवतात. मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे. पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांचा जर कोणी सर्वाधिक आदर देत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा दावाही त्यांनी केला. स्त्रियांविषयी बोलताना टिप्पणी करताना काय बोलले पाहिजे हे विचार करून बोलले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. बंडातात्या कराडकर यांनी राजकीय क्षेत्रातील महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी दर्शवली.
Join Our WhatsApp Community