सीमा प्रश्नावर अमित शाह यांच्यापुढे संपूर्ण विषय मांडणार – देवेंद्र फडणवीस

72

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नी संपूर्ण स्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपण सांगणार आहोत, अशी मााहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. बेळगावात घडलेल्या घटनांच्या संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी आपण दूरध्वनीवर लगेचच चर्चा केली आणि या घटनांबद्दल त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनांसंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आणि अशा घटना घडविणार्‍यांना सरकार पाठिशी घालणार नाही, हे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. संपूर्ण घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.

कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठिशी आम्ही सारे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने कुणालाही, कुठल्याही राज्यात प्रवास करण्याचा, निवासाचा आणि नोकरीचा अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळे असे करण्यापासून कुणीही, कुणालाही रोखू शकत नाही. राज्या-राज्यात अशा प्रकारचे वातावरण तयार होणे हे सुद्धा योग्य नाही. विशेषत: सर्वोच्च न्यायालयात विषय प्रलंबित असताना तर अशा घटना घडूच नयेत. स्थिती बिघडविणे, हे दोन्ही राज्यांच्या हिताचे नाही. पण एखादे राज्य जर ऐकतच नसेल, तर हा विषय केंद्राकडे न्यावा लागेल. म्हणूनच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हा संपूर्ण विषय आपण मांडणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुळात आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक आधी घेतली आणि या प्रश्नात लक्ष घातले. त्या बैठकीला शरद पवारांना सुद्धा आमंत्रित केले होते. कदाचित प्रकृतीमुळे ते येऊ शकले नसावेत. त्यांनी सीमा प्रश्नी नेहमीच चांगलीच भूमिका घेतली आहे. 48 तासांत पवारांना तेथे जाण्याची वेळ येणार नाही. कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठिशी आम्ही सारे आणि सरकार म्हणून सुद्धा ठामपणे आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)

क्रियेला प्रतिक्रिया येते

एखादी घटना घडली की, क्रियेला प्रतिक्रिया येते. पण, महाराष्ट्र हे कायम न्यायाच्या तत्त्वावर चालणारे राज्य आहे. न्यायप्रियतेसाठी आपले राज्य संपूर्ण देशात ओळखले जाते आणि ती आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच महाराष्ट्रात कुणीही कायदा हाती घेऊ नये, ही माझी सर्वांना विनंती आहे, असे आवाहन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाविकास आघाडीच्या मोर्चासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुढे करुन मोर्चे काढणे योग्य नाही. विरोधकांच्या मोर्चाचे खरे कारण वेगळे आहे आणि ते सर्वांना ठावूक आहे. राज्यपालांवरील राग काढण्यासाठी आणि आपला राजकीय अजेंडा चालविण्यासाठी अशापद्धतीने आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करणे, हे अजिबात योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कायमच आमचे आदर्श होते, आहेत आणि राहतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.