आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा परवडणार नाही, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

117

कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे.

काय आहे पत्रात?

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल, मी संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने आपणाशी पत्रव्यवहार केला होता. आज दुसर्‍या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या 8 दिवसांत अतिशय कमी चाचण्या झाल्या आहेत.

19 एप्रिल- 36,556

20 एप्रिल- 45,350 

21 एप्रिल- 47,270 

22 एप्रिल- 46,874

23 एप्रिल- 41,826

24 एप्रिल- 39,584

25 एपिल- 40,298

26 एप्रिल- 28,338

अशा चाचण्या झाल्या आहेत. त्याची सरासरी 40,760 इतकी आहे.

(हेही वाचाः बीडची परिस्थिती विदारक! अंत्यसंस्कारांचेही  नियोजन करा! उच्च न्यायालयाचे निर्देश )

कमी चाचण्या परवडणार नाहीत

नागपूर जिल्ह्यात 40 लाख लोकसंख्येत या कालावधीतील ही सरासरी 26,792 चाचण्या प्रतिदिन अशी असून, 68 लाख लोकसंख्येच्या पुण्यात 22 हजार चाचण्या प्रतिदिन होत आहेत. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ 40 हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल. आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला, तर राज्यात जवळजवळ 40 टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत. 26 एप्रिल रोजी नोंदवलेल्या मुंबईतील 28 हजार चाचण्यांमधील 40 टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या, तर केवळ 16,800 आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने 14 ते 18 टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर 25 ते 27 टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजीबात परवडणारे नाही.

‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळण्याची गरज

आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर हवे, असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही. मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडवण्याचे काम होत आहे. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत सुद्धा आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. मुंबईत तर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्याच लागतील, शिवाय राज्याच्या अन्य भागात सुद्धा ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. त्यातही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, असे देवेेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचाः ठाकरे सरकारसमोर आता १२ कोटी डोसचे आव्हान! मोफत लसीचा निर्णय अद्याप नाहीच)

आभासी चित्र योग्य नाही

आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्ग दर 15 टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे. या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. पण महत्त्वाचे हे की, हा शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.