राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील सध्या उघडकीस आलेल्या परीक्षा घोटाळ्यावर चर्चा करण्याच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी केली. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी तो प्रस्ताव नाकारला असता फडणवीस यांनी यावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावेळी काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे यावर गुरुवारी, २३ डिसेंबर रोजी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय म्हणाले फडणवीस?
राज्यातील परीक्षा घोटाळ्यामुळे तरुणांमध्ये रोष आहे. न्यासा नावाच्या कंपनीला २१ जानेवारी २०२१ रोजी अपात्र ठरवले त्यानंतर उच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी पात्र केले. त्यानंतर मात्र याच कंपनीला पुन्हा काम देण्याची गरज नव्हती. या आधी ४ कंपन्या पात्र ठरवल्या होत्या. त्यांना का डावलण्यात आले? आरोग्य, म्हाडा परीक्षा घोटाळा झाला. टीईटी घोटाळा झाला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झाली नाही. या घोटाळ्याप्रकरणी महेश बोटले याला अटक केल्यावर त्याने दिलेल्या माहितीवरून १२ जणांची माहिती मिळाली. यात मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत तार जुळलेली आहे. सर्व शासकीय यंत्रणा सडलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ६ ते साडे सहा लाख रुपये घेण्यात आले. टीईटी परीक्षेसाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीला नियुक्त केले. ही कंपनी काळ्या यादीत होती. तिलाही ३ महिन्यात बाहेर काढून काम दिले.
(हेही वाचा ‘या’ कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी चहापानाला मारलेली दांडी)
काँग्रेसचा पाठिंबा
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, या घोटाळ्यामुळे मोठ्या संख्येने तरुणांवर अन्याय झाला आहे. या घोटाळ्याचे संबंध कुणापर्यंत जोडले आहेत, हे समोर आले पाहिजेच, असे पटोले म्हणाले.
Join Our WhatsApp Community