दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सरकारने प्रश्नोत्तरे, चर्चा नाकारली आहे. अशा प्रकारे सरकारने लोकशाहीला कुलूप लावले आहे, पण जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन लोकशाहीला कुलूप कसे लावता येईल? विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ, असा आक्रमक विरोधी पक्षनेते पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
सोमवार, ५ जुलै रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे विधिमंडळ परिसरात आगमन झाले. त्यावेळीही भाजप आमदारांनी जोरदार घोषणबाजी केली. सभागृह सुरु होताच फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेत अधिवेशन दणाणून सोडणार असल्याचे संकेत दिले. सुरुवातीलाच त्यांनी सरकारचा समाचार घेतला. हे सरकार लोकशाहीला कुलूप पाहतंय.. प्रश्नांना बगल देऊन लोकशाहीला कुलूप कसे लावता येईल? विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्ही जनतेत जाऊ, असे फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा : एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार! अजित पवारांची घोषणा)
सरकारला विरोधकांना बोलू द्यायचे आहे की नाही?
आम्हाला आजच्या दिवसाची कार्यक्रम पत्रिका दिली नाही. हे नेमके काय चालले आहे. सरकारला नेमके काय करायचे आहे? आम्हाला बोलू द्यायचे आहे की नाही? सरकारने चर्चेला वेळ दिला नाही. पण हे असेच जर चालत राहिले आणि विरोधकांची सभागृहात मुस्कटदाबी होत असेल तर आम्हाला जनतेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे फडणवीस म्हणाले.
देशमुख असेच मधे मधे बोलत होते! – मुनगंटीवारांचा गर्भीत इशारा
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मधे मधे बोलत होते. आता आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. सभागृह सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर 50ए अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलत आहे. हा माझा अधिकार आहे. तुम्ही मधे मधे बोलण्याचे कारण नाही. सरकारची चमचेगिरी सुरू आहे, असे मुनंगटीवार म्हणाले.
(हेही वाचा : विधानभवनाबाहेर विरोधक आक्रमक)