‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ म्हणजे सरकारची जबाबदारीच नाही का?

महाराष्ट्राने कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली असती, तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते, ३० हजार ९०० मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता, असे अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचे?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सर्वात आधी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी…’ आता ‘मी जबाबदार’…म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही का? सरकार हात झटकून मोकळे आहे. आपली पाठ थोपटण्यासाठी तयार. मागच्या वेळी सुधीर मुनगंटीवार बोलले ‘सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली मोदींची’. आमची काही जबाबदारीच नाही, अशा प्रकारची अवस्था आपल्याला पहायला मिळत आहे. राज्यपालांचे भाषण म्हणजे पुढील एक वर्षात काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे, यासंदर्भात असले पाहिजे. पण त्यात काहीच पहायला मिळत नाही. फक्त शब्दांचे रत्न लावून लोककल्याण साधता येत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आदित्य ठाकरेंनाही चिमटा

वरळीच्या आमदारांचे नाईट लाईफचे स्वप्न होते. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाईट क्लबमध्ये जाऊन तिथून फेसबुक लाईव्ह केले. ‘११ वाजल्यानंतर बंद’ हा नियम इतरांकरता आहे. कमला मिलमध्ये यो क्लब, प्रिन्स बारमधून फेसबुक लाईव्ह झाले. तिथे असलेल्या लोकांनी कुणीही मास्क लावला नव्हता. तिथे कोविड होत नाही. मंदिरात आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये कोविड होतो का? हे बार कुणाच्या आशीर्वादाने चालतायत?, असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

(हेही वाचा : स्वा. सावरकरांसाठी साधं एक ट्वीटही नाही, संभाजीनगरचाही पडला मुख्यमंत्र्यांना विसर- फडणवीस!)

डॉक्टरचा सल्ला घेता की कम्पाऊंडरचा?

यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही, हे मला राज्य सरकारला सांगायचे आहे. देशात झालेल्या एकूण कोरोना मृत्यूपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाबद्दल पाठ थोपटून घेत आहात? डॉक्टरचा सल्ला घेता की कम्पाऊंडरचा, हा प्रश्न मला खरोखरच या सरकारला विचारावासा वाटतो. देशाच्या ४६ टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे फडणवीस म्हणाले. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या एका सदस्याला चाचणी केंद्रावरुन रिपोर्ट कसा पाहिजे, पाॅझिटीव्ह कि नेगिटीव्ह?, अशी विचारणा झाली. मग कशाच्या आधारे अमरावतीत लॉकडाउन केला? आज मनात आलं की लॉकडाउन केले जात आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

कोविड काळात भ्रष्टाचार

कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने परिस्थिती उत्तम हाताळली असती, तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते, तर ३० हजार ९०० मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता, असे अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचे? आम्ही सगळ्यात मोठे रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचे सांगण्यात आले, पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचे थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भांड दिले. पंख्याचे ९० दिवसांचे भाडे ९ हजार दिले. हजार प्लास्टिक खुर्च्यांचे भाडे चार लाख रुपये, लाकडाचे १५० टेबलचे भाडे सहा लाख ७५ हजार रुपये, काय काय घोटाळे सांगायचे. जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. मृतदेहांच्या बॅग, पीपीई किटचाही घोटाळा झाला. घोटाळा समोर आणला तर ‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी’ या शब्दाचा अर्थ कळेल, अशी टीका त्यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here