महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे केवळ दहा दिवसांचे असले, तरी हे अधिवेशन आरोपांमुळे वादळी ठरणार याचा प्रत्यय पहिल्या दिवसापासूनच येत आहे. आज अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सुद्धा विरोधकांनी आपला आक्रमक बाणा कायम ठेवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वा. सावरकर आणि संभाजी नगरच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली.
स्वा. सावरकरांसाठी एक ट्वीटही नाही
अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वा. सावरकरांच्या त्यागाची आठवण करुन दिली. सरकारमध्ये असलेला शिवसेना पक्ष हा सध्या कॉंग्रेसच्या दबावाखाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या स्वा. सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त साधं एक ट्विट करुन त्यांना अभिवादन सुद्धा केले नाही. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावर सुद्धा मुख्यमंत्री कुठलीच भूमिका घेत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(हेही वाचाः भाजप आमदार सभागृहात करू लागले म्याव… म्याव…!)
नामदेव महाराजांचा विसर पडला का?
वारकरी संप्रदायाची परंपरा ही खूप मोठी आहे. आज महाराष्ट्राची या वारकरी संप्रदायामुळे जगात ओळख आहे. पण भागवत धर्माची पताका विश्वात नेऊन ख-या अर्थाने विचार दिला त्या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं नाव थोर पुरुषांच्या यादीत का समाविष्ट केले गेले नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. या ७५०व्या जयंतीनिमित्त सरकारने कुठलीही हालचाल केली नाही. कारण या सरकारला महाराष्ट्रात कोरोना हा फक्त मंदिरे आणि सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांमध्ये वाढतो असे वाटते. मला आश्चर्य वाटतं की, पब, दारुची दुकाने, हॉटेल्स, सिनेमागृहे, राजकीय मेळावे चालू शकतात, त्यांनी कोरोना वाढत नाही. पण मंदिरे आणि शिवजयंती उत्सवातून कोरोना वाढतो, हे जे काही चाललं आहे ते खूप चुकीचे आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली.
(हेही वाचाः काँग्रेसच्या नादी लागून मुख्यमंत्र्यांनी स्वा. सावरकरांना टाळले! फडणवीसांचा हल्लाबोल )
याआधीही केली होती टीका
याआधीही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला याच मुद्द्यांवरुन धारेवर धरले होते. जन्मभर ज्या काँग्रेसने स्वा. सावरकर यांच्यावर अन्याय केला, पण त्यांच्याही पेक्षा वाईट सत्तेसाठी लाचार होऊन मुख्यमंत्र्यांनी स्वा. सावरकरांवर अन्याय केला. म्हणून न मागताही मुख्यंमत्री ठाकरे यांना आपण फुकटचा सल्ला देतो की, सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर लिहिलेला इतिहास कायम लक्षात राहतो. त्यामुळे काँग्रेसच्या नादी लागून स्वा. सावरकरांना अपमानित करू नका, सत्तेसाठी लाचारी स्वीकारू नका, असेह फडणवीस त्यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.