धनंजय गावडेंचा राजकारणातील ‘कमबॅक’चा प्लॅन फसणार? 

धनंजय गावडे यांना सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांत पोलिसांसमोर शरण जाण्याचा आदेश दिला आहे, तर मनसुख हिरेन याला मृत्यूपूर्वी गावडे भेटले होते, असा आरोप गावडेंवर झाला आहे. 

वसई-विरार या भागात बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. इथे शिवसेना सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वसई-विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. अशा वेळी एकेकाळी या भागात सेनेला उभारी देणारे धनंजय गावडे पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असे संकेत मिळाले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशामुळे गावडेंना पुन्हा अटक होऊन सेनेला या ठिकाणी धक्का बसणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच राजकारणात ‘कमबॅक’ होण्याचा गावडेंचा प्लॅनही फसणार आहे.

‘मी परत येतोय’ असे बॅनर लावले होते!

धनंजय गावडे हे २०१५ वसई-विरार महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, त्यानंतर सेनेचे गटनेते बनले. त्याच वेळी पालघर जिल्ह्याचे सेनेचे उपाध्यक्ष बनले होते. मात्र २०१७ मध्ये त्यांच्यावर खंडणीचा आरोप झाला. गावडे यांच्यावर खंडणी, बलात्कार, धमकावणे असे एकूण १० गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यात ते कारागृहात गेले, त्यामुळे शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिल्याने गावडे सध्या बाहेर आहेत. त्यामुळे गावडे यांना पुन्हा एकदा राजकारणात विशेषतः शिवसेनेत सक्रिय होऊ, अशी आशा होती. त्याप्रमाणे वसई-विरार परिसरात त्यांच्या नावाने ‘मी परत येतोय’ या आशयाचे बॅनरही लागले होते. मात्र गावडे यांचा ‘कमबॅक’चा प्लॅन आता फसणार, अशी शक्यता आहे. कारण एका बाजूला गावडेंना ज्या सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला त्याच न्यायालयाने आता गावडेंना १५ दिवसांत पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे गावडे यांच्यावर मनसुख हिरेनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोप झाल्याने त्यांच्यासमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

(हेही वाचा : पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी सामना रंगणार!)

मनसुख हिरेनच्या मृत्यूप्रकरणी अडकले गावडे!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो सापडल्यावर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणात निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक झाली आणि गावडेच्या अडचणी वाढल्या. सध्या एनआयए सचिन वाझे याची कसून चौकशी करत आहे. मनसुख हिरेनच्या हत्येचे गूढ उलगडत आहे. त्याच्या चौकाशीतून निलंबित पोलीस विनायक शिंदेला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने वाझेच्या सोबत राहून हिरेन याला ठार केल्याचा संशय आहे. याच हिरेनला मृत्यूपूर्वी धनंजय गावडे भेटला होता, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हिरेन याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशनही गावडे याच्या घराबाजूचे आढळून आले होते, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळेही गावडे आता पुरते अडकले असून त्यांचा राजकीय पुनरागमनाचा प्लॅन फसला आहे. २०१७मध्ये सचिन वाझे आणि धनंजय गावडे हे दोघे खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी आहेत. गावडे यांनी हिरेन प्रकरणातही वाझे याच्याशी मैत्री निभावली आहे का, असा प्रश्न फडणवीस यांच्या आरोपामुळे उपस्थित झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here