मुंबईत प्रभादेवी येथे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य ठाकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित होते.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ विरोधात टाटा मोटर्सची मुंबई उच्च न्यायालयात धाव )
लेन्स शब्दावरून टोलेबाजी
नेत्रालयाच्या उद्घाटनाचे निमित्त साधून पंकजा मुंडे यांनी लेन्स या शब्दावरून धनंजय मुंडे यांच्यावर टोलेबाजी केली. “ज्या व्यक्तीच्या राजकीय अनुभवाच्या लेन्सेस चांगल्या आहेत असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्स सर्वांना सूट करतात आणि जे सर्वांसोबत प्रेमळ वागतात असे बाळासाहेब थोरात, एक नवीन चेहरा आणि ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे असे आदित्य ठाकरे, आमचे शेजारी विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेले अमित देशमुख, मुंडे महाजनांच्या लेन्समधून स्वत:ला मोठे करत पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे”… अशाप्रकारची टोलेबाजी करत पंकजा मुंडे यांनी भाषणाची सुरूवात केली.
धनंजय मुंडेंचे प्रतिउत्तर
यावर प्रतिउत्तर देत पंकजाताई कधीतरी अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये यावं लागत, आता आम्ही व आदित्य ठाकरे बसलो होतो आणि बोलत होतो की, कदाचित ताईंनी लेन्स बदलल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या लेन्स लावल्या तर बरं होईल असे धनंजय मुंडेंनी सांगितले. तसेच कितीही राजकीय वैर असले तरी काही व्यक्ती अशा आहेत ज्यांच्यासाठी आमचे वैर वगैरे काही नाही त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने असेही धनंजय मुंडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community