राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३५ दिवसांनी झाला, तसेच पावसाळी अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली. मात्र त्याच वेळी नव्या चर्चेला उधाण आले आहे. गुरुवारी, ११ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
गोगल गायीमुळे सोयाबीनचे १० हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदतीची घोषणा झाली पाहिजे, यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जशी मदतीची घोषणा झाली आहे, तशी मदत या गोगल गायीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, यासाठी आपण भेटायला आलो आहे.
– धनंजय मुंडे, माजी मंत्री
भेटीगाठींच्या चर्चा फडणवीसांच्या बाजूने सुरु
सध्या राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. नेत्यांच्या भेटीगाठीने अनेक जण तर्क लढवू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार-खासदार जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतात, तेव्हा या अशा चर्चांना जोर येत असतो, आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे फडणवीसांच्या बाजूने भेटीगाठींच्या विषयावर चर्चेला जोर आला आहे.
(हेही वाचा महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत, काँग्रेसने दिला थेट इशारा! राजकीय वर्तुळात खळबळ)
धनंजय मुंडे अजित पवारांच्या मर्जीतले
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे खास समजले जातात आणि अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यामधील मैत्री ही मोकळी ढाकळी आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेणे हे राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेप्रमाणे भूकंप घडवून आणणारी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. २०१९ मध्ये जेव्हा शिवसेनेने भाजपाला दूर करून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णय घेतला होता तेव्हा अजित पवार हे रातोरात फडणवीसांना जाऊन मिळाले होते आणि पहाटेच फडणवीस आणि पवार यांनी शपथविधी उरकून महाराष्ट्राला धक्का दिला होता, त्यावेळी धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत होते.
Join Our WhatsApp Community