Dharashiv District Assembly : २५ वर्षांत पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यात विधानसभेला घड्याळ नाही

महायुतीत तीन जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने टिकटिक तूर्त ठप्प

57
Dharashiv District Assembly : २५ वर्षांत पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यात विधानसभेला घड्याळ नाही
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षस्थापनेपासूनच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेल्या घड्याळ चिन्हाचा आजवर बोलबाला होता. मात्र, पक्षफुटीनंतर युती-आघाडीच्या राजकारणात घड्याळ चिन्हाला तूर्त दोन पावले मागे घ्यावी लागली आहेत. उस्मानाबाद व परंडा मतदारसंघावर वर्चस्व राखून असलेले घड्याळ यंदाच्या विधानसभेला एकाही मतदारसंघात गजर करणार नाही. २५ वर्षांत असे पहिल्यांदाच घडते आहे. (Dharashiv District Assembly)

काँग्रेसपासून वेगळे होत १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर झाली. अगदी या पहिल्या निवडणुकीपासून पक्षाचा झेंडा जिल्ह्यात कायम फडकत राहिला. पहिल्याच निवडणुकीत चार मतदारसंघांत उमेदवार देण्यात आले. त्यात डॉ. पद्मसिंह पाटील हे उस्मानाबाद मतदारसंघातून विजयी झाले, तर उर्वरित दोन मतदारसंघांत उमेदवार दुसऱ्या स्थानी होते व एकात तिसऱ्या स्थानी.

डॉ. पद्मसिंह पाटील हे स्थापनेपासूनच पक्षाची भिंत बनून राहिल्याने, पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी झाली. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी पाटील कुटुंबीय राष्ट्रवादीपासून वेगळे झाले. पुढे पक्षातही फूट पडली. या घडामोडींचा परिणाम म्हणून की काय, यावेळी जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक होत नाही. २५ वर्षांत ही अशी पहिलीच वेळ आहे. (Dharashiv District Assembly)

(हेही वाचा – Jannik Sinner : यानिक सिनरला २०२४ चा एटीपी चषक)

जिल्ह्यात बंड झाले थंड

अभी नहीं तो कभी नहीं’, म्हणत जिल्हाभरात अनेक पदाधिकाऱ्यांनी राजकीय यावेळी आमदारकीसाठी अर्ज केला होता. पक्षांकडून उमेदवारीचा हिरमोड पदरी पडल्यानंतरही अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवले होते. मात्र, सोमवारी शेवटच्या दिवशी जवळपास सर्वच बंडखोरांनी माघार घेत लढतीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. उस्मानाबाद विधानसभेसाठी शिवसेना तसेच उद्धवसेनेतूनही बंडखोरांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी सर्वांनीच आपले अर्ज मागे घेतले. परंडा मतदारसंघात बंडखोरी नव्हती. मात्र, जागावाटपाच्या पेचातून शरद पवार गट व उद्धवसेनेने अधिकृत उमेदवार दिले. सोमवारी या शर्यतीतून उद्धवसेनेने माघार घेतली. उमरग्यातूनही उद्धवसेनेला बंडखोरी शमविण्यात यश मिळाले आहे. तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेस तसेच भाजपालाही बंडखोरी थोपविण्यात यश आले.

परंडा मतदारसंघातून आघाडीकडून दोन अधिकृत उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी उद्धवसेनेने माघार घेतल्याने याठिकाणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार राहुल मोटे कायम राहिले. त्यांची लढत आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरुद्ध होणार आहे. मागील टर्मलाही या दोघांतच प्रमुख लढत झाली होती. वंचित’ नेही चांगली मते घेतली होती. (Dharashiv District Assembly)

उस्मानाबाद : मतदारसंघातून शिंदेसेनेकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. अखेरच्या दिवशी सुधीर पाटील, सूरज साळुंखे, शिवाजी कापसे यांनी माघार घेतल्याने बंड टळले. उद्धवसेनेकडून इच्छुक राहिलेले माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनीही आपला अर्ज मागे घेतला. यामुळे आता उद्धवसेनेचे आ. कैलास पाटील विरुद्ध शिंदेसेनेचे अजित पिंगळे अशी लढत होणार आहे.

(हेही वाचा – रत्नागिरीतून १३ Bangladesh मुस्लिम घुसखोरांना अटक)

तुळजापूर : मतदारसंघातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले होते. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांनीही माघार घेतली. अपक्ष अशोक जगदाळे हेही यावेळी रिंगणात नाहीत. त्यामुळे भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांना लढा द्यावा लागेल.

उमरगा : मतदारसंघात उद्धवसेनेकडून विलास व्हटकर यांच्यासह अन्यही काही इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी या सर्वांनी माघार घेतली. महायुतीतील भाजप व अजित पवार गटाकडूनही बंड करीत शिंदे पिता-पुत्रांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्याशी उद्धवसेनेच्या प्रवीण स्वामी यांना लढावे लागणार आहे. लातूर पॅटर्नला विरोध असलेला समाजघटक कोणती भूमिका घेतो, यावरही बरेच काही अवलंबून असेल. (Dharashiv District Assembly)

मतदारसंघ चार, मैदानात महिला उमेदवार केवळ पाच

महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या स्तरातून अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. यातूनच आज जवळपास सर्वच क्षेत्रात महिलांचा वावर दिसून येतो. मात्र, राजकारणापासून या लाडक्या बहिणी अजूनही चार हात लांबच असल्याचे दिसून येत आहे.धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण ६६ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, यातील केवळ ५ महिला उमेदवार आहेत.

धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातच महिलांना नाममात्र संधी मिळालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणामुळे राजकारणात महिलांचा वावर वाढीस लागलेला असला तरी आजही त्यातील बहुतांश महिला या पतीच्या आग्रहाखातर राजकारणात पाऊल टाकलेल्या दिसतात, तर दुसरीकडे सक्षम असलेल्या महिला पुरेशा संधीवाचून मागे राहिल्या आहेत. यामुळेच राजकीय क्षेत्रात महिला उपेक्षित राहिल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीत कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाकडून महिलांना संधी मिळालेली नाही. केवळ वंचित बहुजन आघाडीने तुळजापुरातून महिला उमेदवार दिली आहे. चारही मतदारसंघात मिळून ६६ उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यातील केवळ पाचच महिला उमेदवार आहेत. (Dharashiv District Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.