गेल्या दोन दशकांपासून धारावीचा पुनर्विकास लटकलेला आहे. आता धारावी पुनर्विकासाची निविदा अदानी समूहाने जिंकल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी या पुनर्विकास प्रकल्पाची एकही वीट न रचता गेल्या १५ वर्षांत तब्बल ३१.२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुनर्विकासासाठी सर्वेक्षण, जाहिरातबाजी, व्यवसायिक शुल्क आदी बाबींवर प्रामुख्याने ही रक्कम खर्च करण्यात आली आहे.
( हेही वाचा : RTO चा मोठा निर्णय! प्रवासी वाहनांमध्ये ‘ही’ सुविधा नसल्यास होणार दंडात्मक कारवाई )
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आजवर झालेल्या खर्चाची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे मागितली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मागील १५ वर्षात करण्यात आलेल्या खर्चाची यादी दिली. १ एप्रिल २००५ पासून ३१ मार्च २०२० अशी १५ वर्षाच्या खर्चाची माहिती त्यात आहे. १ एप्रिल २००५ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत ३१ कोटी २७ लाख ६६ हजार १४८ रूपये धारावी पुनर्विकास प्रकल्पावर खर्च करण्यात आले आहेत.
कशावर किती खर्च?
- पीएमसी शुल्कावर १५.८५ कोटी खर्च
- जाहिराती आणि प्रसारावर ३.६५ कोटी खर्च
- व्यवसायिक शुल्क आणि सर्वेक्षणावर ४.१४ कोटी खर्च
- विधी शुल्कापोटी २.२२ कोटी खर्च.