भाजपच्या तमिल सेल्वनवर धारावीची जबाबदारी: लाड यांच्याकरता सेल्वनला दाखवला धारावीचा रस्ता

121

आगामी महापालिका निवडणुकीच्या कामाला सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असून, भाजप मात्र महापालिका निवडणुकीतून विधानसभेचीही तयारी करत आहे. शीव कोळीवाडा विधानसभेचे आमदार तमिल सेल्वन यांच्याकडे सध्या भाजपने धारावीची जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेल्वन यांच्याकडे धारावीची जबाबदारी दिली असली तरी भविष्यात भाजपच्यावतीने धारावीची बांधणी करून त्यांना तिथून उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार सुरु आहे. त्यामुळे सेल्वनला धारावीतून विधानसभेची उमेदवारी देऊन शीव कोळीवाड्यातून विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्याचा विचार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अद्यापही निश्चित झाली नसली तरी लवकरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तारीख न्यायालयाच्या निर्णयावर प्रलंबित आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा आणि लोकसभेची जबाबदारी आमदार व खासदारांवर सोपवली आहे. यामध्ये ज्या विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपचे आमदार नाहीत त्या मतदार संघांची विशेष मोर्चेबांधणी केली जात आहे.

त्याअंतर्गत धारावी विधानसभेची जबाबदारी शीव कोळीवाडा मतदार संघाचे आमदार तमिल सेल्वन यांच्याकडे सोपवली आहे. धारावीत विधानसभा सलग चार वेळा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आजवर २०१४ ची निवडणूक वगळता उर्वरीत निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युतीचा उमेदवार होता. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. शिवसेनेकडून माजी आमदार बाबूराव माने यांना ३२ हजार ३९० आणि भाजप उमेदवार दिव्या ढोले यांना २० हजार ७६३ मते मिळाली होती. म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती असती तर त्यांची मतांची संख्या सुमारे ५२ हजार झाली असती. पण त्यावेळी दोन्ही मतांची विभागणी झाल्याने वर्षा गायकवाड ४७ हजार ७१८ मते मिळवत विजयी झाल्या होत्या.

धारावीमध्ये सध्या भाजपचा एकही नगरसेवक नसून शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत, तर काँग्रेसच्या २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे. त्यामुळे धारावीमध्ये भाजपचे कमळ फुलवण्यासाठी शीव कोळीवाड्याचे आमदार तमिल सेल्वन यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सेल्वन यांनी धारावी विधानसभेतील सर्व प्रभागांमध्ये भाजपची बांधणी करायला सुरुवात केली आहे. आजवर भाजपची जबाबदारी मणिबालन यांच्याकडे होती, परंतु प्रत्यक्षात मणिबालनने पक्षाची धारावीत मजबूत करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही.

( हेही वाचा: ‘वंदे मातरम्’: कादंबरीतील कविता ‘अशी’ बनली भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ )

धारावीमध्ये केवळ प्रभाग क्रमांक १८८ मध्ये भाजपचे संजय उपाध्याय यांचा केवळ ६८० मतांनी पराभव झाला होता. तर उर्वरीत सर्व मतदार संघांमध्ये काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे तीन उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे यंदा धारावीतील तमिल, कुचिकुरवे तसेच दक्षिण भारतीय मतदारांची संख्या पाहता सेल्वन यांच्याकडे धारावीचा गड मजबूत करण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे सेल्वन यांना धारावीत पाठवून शीव कोळीवाड्याची जबाबदारी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्याकडे सोपवण्याचा पक्षाचा विचार आहे. लाड यांनी २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत ११ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचे तमिल सेल्वन यांनी ४० हजार ८६९ मते मिळवत विजय मिळवला होता. तर शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, त्यांनी ३७ हजार मते मिळवत कडवट झुंज दिली होती, तर या विधानसभेचे माजी आमदार जगन्नाथ शेट्टी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे २३ हजार १०७ मते मिळवत पराभव पत्कारावा लागला होता. तर २०१९च्या निवडणुकीत आमदार तमिल सेल्वन ५४ हजार मते मिळाली होती. या मतदार संघात युतीची ७७ हजार मते असताना सेल्वन यांना केवळ युतीतही ५४ हजार मिळाली होती, याचा अर्थच मागील निवडणुकीत सुमारे २३ हजार मते कमी पडली होती आणि ही सर्व मते काँग्रेस उमेदवर गणेश कुमार यादव यांच्या पारड्यात पडली होती. गणेश यादव यांना ४० हजार मते  मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेची मते काँग्रेस आणि मनसेच्या पारड्यात गेली होती.

लाड हे विधान परिषद सदस्य असल्याने या मतदार संघामध्ये भाजपच्या कृष्णावेणी रेड्डी, राजेश्री शिरवडकर आणि अंशत: नेहल शाह यांचा प्रभाग आहे. तर शिवसेनेचे मंगेश सातमकर, रामदास कांबळे तर काँग्रेसचे रवी राजा यांचे प्रभाग आहे. त्यामुळे विधान परिषदेचा निधी या तिन्ही नगरसेवकांच्या प्रभागा वापरुन लाड यांनी विधानसभेतील इतर प्रभागांमध्ये भाजपची कमान मजबूत करण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीत लाड शीव कोळीवाड्यात आणि तमिल सेल्वन हे धारावीतून निवडणूक लढवताना दिसतील. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या समाजाची लोक असल्याने राजा यांना भाजप प्राधान्य देऊ शकते आणि जर राजा शिवसेनेत गेल्यास सातमकर यांचा पत्ता कापून राजा यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.