दीपाली सय्यद यांना तारीख पे तारीख, शिंदे गटातील प्रवेश लटकला?

108
उद्धव आणि रश्मी ठाकरेंवर जहरी टीका करीत एकनाथ शिंदे यांच्या छावणीत दाखल होऊ इच्छिणाऱ्या दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश लटकला आहे. गेल्या शनिवारपासून त्या वेटिंगवर असून, भाजपाच्या विरोधामुळेच इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी स्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.
सय्यद यांनी ९ नोव्हेंबर रोजी रश्मी आणि उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आजच सामील होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, शिंदे त्यांना भेटलेच नाहीत. त्यानंतर एक-दाेन दिवसांत शिंदे गटात प्रवेश हाेईल, असे त्यांनी सांगितले. ते दोन दिवसही असेच गेले.
रविवारी आनंद आश्रम येथे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, अचानक आज प्रवेश होणार नाही, असे त्यांना कळविण्यात आले. याउलट त्याच दिवशी, त्याच वेळी अन्य १५० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यात सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचाही समावेश आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश लटकल्याच्या चर्चा आहेत.

भाजपाचा विरोध वाढला

दीपाली सय्यद यांना शिंदे गटात घेण्यास भाजपाच्या काही नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका केली होती. त्यामुळे आधी सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाची माफी मागावी. त्यानंतरच त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला जावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी केली आहे.

मोदींवरील टीका भोवली?

  • मोदी आणि अमित शाहांनी मसणात जावे, महागाई आटोक्यात आणता येत नसेल ना तर हिमालयात जाऊन संन्यास घ्यावा, असे वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केले होते.
  • राणा दाम्पत्याच्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. तेव्हादेखील दीपाली सय्यद यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मधे खेचले होते.
  • ती गाडी मोदींची जरी असती तरी गाडीवर चप्पल आणि दगड पडलेच असते, कारण शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, अशा शब्दांत दीपाली सय्यद यांनी भाजपवर प्रहार केला होता.
  • त्यामुळे मोदींवरील टीका सय्यद यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.