शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले गेले. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील त्यांच्या पातळीवर हा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आले नाही. कित्येक दिवसांपासून दीपाली सय्यद नाराज असून त्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा – रामनगरी अयोध्या 18 लाख पणत्यांसह विश्वविक्रमासाठी सज्ज, कसा असणार अयोध्येतील ‘दीपोत्सव’)
सुषमा अंधारे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद या नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर बोलताना त्या म्हणाल्या, शिवसेनेत सुषमा अंधारे आल्या म्हणून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. परंतु प्रत्येकजण आपले काम करत असतो. मी जे करतेय ते माझ्या कामातून लोकांसमोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी राजकीय घडामोडींदरम्यान, राजकारणात सक्रिय आहे. काही गोष्टींचे नियोजन करायचे असते. काही कामं करायची असतात. ती कामं टप्प्या-टप्प्याने पूर्ण करायची असतात. त्याला आपला वेळ द्यावा लागतो. त्या कृतीतून आपण केवळ लोकांपर्यंत पोहचू शकतो. तेच मी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे दीपाली सय्यद असेही म्हणाल्या की, प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत आहे आणि त्याची वेगळ्या पद्धतीची इच्छा आहे. पण आपण जे काम करतो त्या कामाला एक स्थान मिळते. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आपला नेता सपोर्ट करत असेल, तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जायला हवं, असे सूचक विधान सय्यद यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही, असेही सय्यद म्हणाल्या. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत असल्याचे दिसतेय.
Join Our WhatsApp Community