शिवसेना पक्ष नक्की कुणाचा, याचा निवडा आता निवडणूक आयोगासमोर होणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी सुनावणी सुरु केली आहे. शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मात्र या युक्तिवादाच्या वेळी शिंदे गटाने थेट शिवसेनेच्या घटनेलाच हात घातला आहे. त्यामुळे आता शिवसेनेची घटना नक्की काय आहे, या घटनेनुसारच पक्षाचा कारभार चालवतो का, यावर खल सुरु झाला आहे. वास्तविक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्षाचा कारभार आणि निर्णय प्रक्रिया ही पक्षाच्या पातळीवर व्हायची. त्यावेळी विधिमंडळातील पक्ष आणि पक्ष संघटना या दोन्ही गोष्टी स्वतंत्र होत्या, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेला अधिक महत्व देत होते, जे पक्षाच्या घटनेला धरून होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात विधिमंडळातील पक्षाला अधिक महत्व दिले आणि पक्ष संघटना मोडकळीस आली. आज जेव्हा निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सामोरे जावे लागत आहे, तेव्हा आयोग शिवसेना पक्ष संघटना आणि पक्षाची घटना यावर मुद्दे उपस्थित करत आहे, तेव्हा ठाकरे गटाची त्रेधातिरपीट होत आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख कसे निवडले जातात?
शिवसेना पक्षप्रमुखाची निवड ही गुप्त मतदानाने आणि निवडणूक अधिकारी नियुक्त करून त्याच्या अधिकारात निवडणूक करून निवडावे, असे शिवसेनेच्या घटनेत म्हटले आहे. मग उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख या पद्धतीने निवडणूक घेऊन निवडले का, असा मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे कागदोपत्री सादरीकरण ठाकरे गटाला निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहेत. याशिवाय शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी, उप नेते, राज्य कार्यकारिणी, राज्यप्रमुख आणि जिल्हाप्रमुख या सर्व पदावरील निवड ही निवडणुकीच्या माध्यमातून करावी, असेही घटनेत म्हटले आहे. मात्र यापैकी कुणाचीही निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाल्याचे आजवर घडलेले नाही.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुख पद वाचवण्यासाठी पळापळ; ठाकरे गटाची दमछाक)
शिवसेनेची प्रतिनिधी सभा अस्तित्वात आहे का?
शिवसेनेच्या घटनेत प्रतिनिधी सभा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यात राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, उपनेते, राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि विधानसभा, विधान परिषदेतील आमदार तसेच मुंबई विभाग प्रमुख यांचा समावेश आहे. ही प्रतिनिधी सभा राष्ट्रीय कार्यकारिणी आणि उपनेत्यांची निवड करते. तसेच राजकीय आणि सामाजिक विषयांवर सूचना करते. शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभेतील विधिमंडळातील आमदार वगळता उर्वरित सर्व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, उपनेते, राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख ही पदे पक्षांतर्गत निवडणुकीत निवडली जातात, ही सर्व पदे मुळात अस्तित्वात आहेत का, त्यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली का, हे शिवसेनेला सिद्ध करावे लागेल.
राष्ट्रीय कार्यकारिणी आहे का?
शिवसेनेच्या घटनेत राज्य कार्यकारिणीत राज्य प्रमुख, राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख असतात. राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य प्रमुखाची निवड करते. एखाद्याच्या विभागावरील नियुक्ती रद्द करायची असेल तर शिवसेनाप्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणीचे मत विचारात घेतात. राष्ट्रीय कार्यकारिणीतील राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख ही पदे पक्षांतर्गत निवडणुकीत निवडली जातात, ही सर्व पदे मुळात अस्तित्वात आहेत का, त्यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली का, हे शिवसेनेला सिद्ध करावे लागेल.
Join Our WhatsApp Community