16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्याला आव्हान देणारी याचिका एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आता 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असतानाच भाजपकडून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या बैठकीत फडणवीस आणि शहांसोबतच वकील आणि राज्यसभा खासदार महेश जेठमलानी यांचा देखील सहभाग होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पेचावर या बैठकीत कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः फडणवीसांनी घेतली शहा-नड्डांची भेट! सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु?)
भाजपचा मुख्यमंत्री असेल…
या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेच्या सूत्रावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि राज्यात भाजपचे एकूण 28 मंत्री असतील. तसेच ज्यांची प्रतिमा जनतेच्या मनात चांगली नाही अशा नेत्यांना सरकारमधून बाहेर ठेवण्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांना सांगितल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत बैठक
या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुंबई गाठली. त्यांच्या सागर या निवासस्थानी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजप आमदार आशिष शेलार,प्रसाद लाड इत्यादी नेते उपस्थित होते. या बैठकीतही सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः पुत्राने,प्रवक्त्याने डुक्कर, घाण म्हणायचं, दुसरीकडे समेटाची हाक द्यायची! याचा अर्थ काय?)