भारतविरोधी घटकांवर कडक कारवाई करावी! पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा

118

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. भारत-इंग्लंड आराखडा 2030 चा भाग म्हणून सुरु असलेल्या अनेक द्विपक्षीय मुद्यांबाबतच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच लवकरात लवकर दोन्ही देशांदरम्यान परस्परांना फायदेशीर ठरेल असा मुक्त व्यापार करार करण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

( हेही वाचा : अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका संकेतस्थळावर सादर करा, अन्यथा…. )

भारतीय कार्यालय व अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही

सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटीश सरकारने भारत-विरोधी घटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. युकेमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला युके सरकारला संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे असे सांगून पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतीय कार्यालय आणि त्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही पंतप्रधान मोदी यांना दिली. युकेमध्ये आश्रय घेतलेल्या आर्थिक गुन्हेगारांचा मुद्दा देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. या आरोपींना भारतीय न्याय व्यवस्थेसमोर हजर करण्याच्या दृष्टीने त्यांना भारतात परत पाठवण्याच्या प्रक्रियेबाबत काय प्रगती झाली अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

 नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या जी-20 परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सुनक यांना दिले. जी-20 समूहाच्या भारताकडील अध्यक्षतेच्या काळात झालेल्या प्रगतीची पंतप्रधान सुनक यांनी प्रशंसा केली आणि भारताचे विविध उपक्रम आणि त्यांच्या यशस्वितेला युकेचा पूर्ण पाठींबा असल्याचा पुनरुच्चार सुनक यांनी केला. बैसाखीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सुनक आणि युकेस्थित भारतीय समुदायाला शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी आगामी काळात परस्परांच्या सतत संपर्कात राहाण्यास मान्यता दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.