मनिषा म्हैसकर यांच्या नावाच्या चर्चेनेच महापालिकेत खळबळ

96

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या बदलीचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले असून काही मंत्रालयातून बदली होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची यादीच सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहे.यामध्ये चहल यांच्या जागी यापूर्वी अतिरिक्त आयुक्तपदाची धुरा सांभाळणाऱ्या मनिषा म्हैसकर यांचे नाव चर्चेत असून म्हैसकर या महापालिका आयुक्तपदी येणार असल्याच्या चर्चेनेच महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. अतिरिक्त आयुक्तपदी असताना म्हैसकर यांचा अनुभव घेतलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी नाराजीचा सूर खासगीत उमटवला.

( हेही वाचा : मुंबई महापालिका कर्मचा-यांची ‘दिवाळी’! सरकारने जाहीर केला घसघशीत बोनस)

सरकारकडून दुजोरा देण्यात आलेला नाही

मुंबई महापालिका आयुक्तपदी असलेल्या इक्बालसिंह चहल यांच्यावर शिंदे सरकारने मुंबईतील विविध सुशोभिकरण प्रकल्पांची जबाबदारी सोपवून डिसेंबर २०२२ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचा सूचना केल्या आहे. त्यामुळे चहल यांची बदली तुर्तास डिसेंबरपर्यंत तरी होणार नाही अशा प्रकारची जोरदार चर्चा असताना बुधवारपासून पुन्हा एकदा चहल यांच्या बदलीची हवा माध्यमांनी निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोशल मिडियावरही बदली होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची यादी व्हायरल होऊ लागली असून त्यामध्ये चहल यांच्या जागेवर महापालिका आयुक्त म्हणून मनिषा म्हैसकर यांचे नाव आहे. या व्हायरल पोस्टमध्ये डॉ.विपीन शर्मा, पी. अनबालघन, प्रविण दराडे, अशोक शिंगरे, अभिजित बांगर, राजेश नार्वेकर, हर्षदीप कांबळे आदींचीही नावे असून कंसात बदलीचे ठिकाण दिले आहे. मात्र, ही यादी व्हायरल होत असली तरी सरकारकडून याला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

मात्र, महापालिका आयुक्तपदी मनिषा म्हैसकर यांच्या नावाची चर्चाच दिवसभर होती. प्रत्येक कर्मचारी म्हैसकर यांच्यासोबतच्या बऱ्या आणि वाईट आठवणींना उजाळा देताना दिसत होता. तर त्यांच्या येण्याच्या कल्पनेनेच अनेक कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरलेली ऐकायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच कर्मचाऱ्यांच्या रासरंगावरून म्हैसकर यांच्या महापालिकेतील नियुक्तीबाबत नाराजीच दिसून येत असून मिलिंद म्हैसकर यांचे मात्र स्वागत करायला कर्मचारी उत्सुक असल्याचे ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.