२०२४मध्ये भाजपाला पर्याय देण्यावर शरद पवार-ममता बॅनर्जींमध्ये चर्चा

132

ममता बॅनर्जी या मुंबईत आल्यापासून देशात भाजपाला पर्याय उभा करण्यासाठी तिसरी आघाडी उघडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती, शेवटी त्यावर शिक्कामोर्तब झाला. माध्यमांशी बोलतांना टीएमसीच्या अध्यक्षा, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला दुजोरा देत ‘जिथे जिथे प्रादेशिक पक्ष चांगले काम करत आहेत. ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपसमोर ताकदीने उभे राहत आहेत. त्या ठिकाणी आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी प्रादेशिक मित्रांनाच साथ देणार, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.  यावेळी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनीही २०२४ मध्ये भाजपाला पर्याय उभा करण्यासाठी बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली, असे स्पष्ट केले.

काय म्हणाले शरद पवार? 

भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतली. आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचे असेल, तर त्यांचे स्वागत आहे. नेतृत्व हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, आमच्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा विषय आहे. कुणाचे नेतृत्व वगैरे ही दुय्यम बाब आहे. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचे, असे शरद पवारांनी यावेळी नमूद केले.

(हेही वाचा सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र)

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात एकत्र येऊन लढलेच पाहिजे, म्हणून आम्ही भाजपाला पर्याय उभा करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येत आहोत. शरद पवार हे आमचे जुने सहकारी आहेत आणि ते भाजपाला पर्याय उभा करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. यावर आमची चर्चा झाली आहे, असे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

यूपीए आहे कुठे?

जर कुणी लढत नसेल तर आम्ही काय करणार? तुम्हाला एकत्र येऊन लढावे लागणार आहे. आता युपीए नाही. युपीए काय आहे?, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. त्यानंतर शरद पवारांनी मुद्दा सावरला. इथे लिडरशीपचा मुद्दाच नाही. लोकांसमोर एक पर्याय उभा करायचा आहे. त्याच मार्गाने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, असे पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.