अजित पवारांना सत्तेत वाटा देऊन भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाला हिसका देतानाच दुसरीकडे शरद पवारांनाही जोरदार धक्का दिला आहे. गरज नसताना अजित पवारांना सोबत घेणे हे अनेकांच्या तार्किकाच्या पुढचे झाले आहे. यामुळे एकतर एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची कारवाई होणार किंवा शिंदे गटाला काहीसे शांत करण्यासाठी भाजपाने खेळलेली ही खेळी असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. नंतर आलेल्यांना आधी जेवायला घातले असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द मिळालेले शिंदे गटाच्या आमदारांत अस्वस्थता आहे. वर्षभर थांबूनही मंत्रिपद मिळालेले नाही, यामुळे एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री आमदारांची बैठक बोलावली होती.
आपली युती ही विचारांची युती होती. आता जे झाले ती पॉलिटीकल अॅडजस्टमेंट आहे. मलाही अनेक प्रश्न होते ते मी थेट विचारले. तुम्हालाही प्रश्न पडले असतील. जे काही घडले त्याची चिंता तुम्ही करू नका. अजित पवारांना सत्तेत घेण्याचा निर्णय मला विश्वासात घेऊनच झाला असल्याचे शिंदे यांनी आमदारांना समजावले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ५ आमदारांवर दिली जाणार आहे. आमदारांची कामे झाली नाहीत तर त्यांनी मला येऊन भेटावे. गेल्यावेळी देखील अजित पवार आणि त्यांची टीम भाजपच्या मागे लागली होती. परंतू तेव्हा आपल्याला प्राधान्य देण्यात आले. शरद पवार आणि ठाकरे विरहित युती आहे. २०२४ मध्ये आपले ५० च्या ५० आमदार निवडून येतील, हे मी जाहीरपणे सांगतो. अडीच वर्षांत झालेली कामे आणि एक वर्षात झालेली कामे यात फरक आहे ना? आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढत आहे. आपल्या जागा कशा वाढतील यावर काम करुया. मी राजीनामा देणार ही चर्चा निरर्थक आहे, असे शिंदे आपल्या आमदारांना म्हणाले.
(हेही वाचा भाजपच्या आमदारांमध्ये देखील नाराजी; शिवसेनेच्या आमदाराचा दावा)
Join Our WhatsApp Community