दसरा मेळावा म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आठवतात. बाळासाहेबांनी स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला होता. बाळासाहेबांचे विरोधक देखील दसरा मेळाव्याची प्रतीक्षा करायचे. दुर्दैवाने आता ते आपल्यात नाहीत. त्यांच्या पक्षाची दोर आता उद्धव ठाकरेंकडे आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ठाकरे पूर्णपणे एकटे पडले आहेत. गंमत अशी आहे की त्यांना माहिती आहे की ते एकटे पडले आहेत, पण सत्य परिस्थिती ते स्वीकारायला तयार नाहीत.
आता शिंदे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे कोणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार हा वाद सध्या रंगला आहे. दोन्ही गटाला दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायचा आहे. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा घ्यायचे, त्यावेळी शिवसैनिक म्हणायचे की विचारांचं सोनं लुटायला चालले आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा त्याग उद्धव ठाकरेंनी केला आहे.
( हेही वाचा : बॉयकॉट बॉलिवूडमुळे भाजपाला ‘हा’ फायदा होऊ शकतो…)
लोक शिवतीर्थावर हिंदुत्वाचा बुलंद आवाज ऐकायला जात होते. आता हिंदुत्वच नाकारल्यामुळे लोकांना काय ऐकायला मिळणार आहे? दुसरी गोष्टी ठाकरेंनी आता संभाजी ब्रिगेडशी आघाडी केली आहे. बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात पाहिली नाही. मग आता शिवाजी पार्कमध्ये जातीद्वेष्ट्ये संमेलन भरणार आहे का?
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी डरकाळी बाळासाहेब द्यायचे. मग आता दसरा मेळावा झाला तर जमलेल्या माझ्या हिंदू आणि ब्राह्मण द्वेष्टे बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असा आवाज ऐकायला येणार आहे का? हिंदुत्वासाठी काय करावं हे बाळासाहेब सांगायचे. आता हिंदुत्व संपवण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे का?
बाळासाहेब असताना हिंदुत्वाचा बुलंद आवाज असं आपण म्हणायचो, आता जातीयवादाचा मंद आवाज म्हणणार आहोत का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडले आहेत. शिवसेनेचा प्रवास असा अधोगतीकडे जाईल असं हिंदुंना कधीच वाटलं नव्हतं. एकनाथ शिंदे यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यांनी बाळासाहेबांचा आवाज बुलंद ठेवला. रक्ताची नाती महत्वाची नसतात, तर मनाची आणि विचारांची नाती महत्वाची असतात हेच शिंदेंनी सिद्ध करुन दाखवलं आहे.
आता दसर्याला दोन मेळावे होणार आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आणि ब्रिगेड बरोबर आघाडी केलेल्यांचा हसरा मेळावा.
Join Our WhatsApp Community