पुढील लोकसभा निवडणुकीत रावेरची जागा काँग्रेसच लढवणार आणि जिंकणार. आता हवा बदलली आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मंगळवारी सावदा येथील बूथमेळाव्यात ते बोलत होते. कोचुर रोडवरील मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र रावेर मतदार संघातून एकनाथ खडसे यांना संधी देण्यात येईल, असे वक्तव केले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी रावेर मतदारसंघ पहिली ठिणगी कारणीभूत ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
संधीचे सोने करण्यासाठी सहकार्य करा
बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या बलिदानातून काँग्रेसने मोठा त्याग केला आहे. रावेर-यावल तालुक्याला स्वातंत्र्यसैनिक धनाजीनाना चौधरी, ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन यांची मोठी परंपरा आहे. देशात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे, मोठी संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर मतदारांशी संवाद साधून सहकार्य करावे.
जयंत पाटील काय म्हणाले होते?
दरम्यान, 5 तारखेला झालेल्या जळगावच्या सभेत जयंत पाटील यांनी खडसेंना लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. जयंत पाटील म्हणाले होते, आता या जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोण? हा प्रश्न आमच्या सर्वांच्याच मनात आहे. नाथाभाऊ हे शिवधनुष्य तुम्हीच उचलले पाहिजे, असे आम्हा सर्वांना वाटत आहे. तुम्ही 25 ते 30 वर्ष दोन-दोन खासदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळेच शरद पवारांची अशी अपेक्षा आहे. 1985 मध्ये शरद पवारांच्या मागे सातच्या सात आमदार निवडून देऊन 100 टक्के रिझल्ट या जिल्ह्याने दिला आहे. ही या जिल्ह्याची परंपरा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, या जिल्ह्यात लोकसभेचे शिवधनुष्य तुम्ही उचलले पाहिजे.
(हेही वाचा Russia Praises India : रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून कौतुक )
काँग्रेसचा सतत पराभव
रावेरमधून लोकसभा लढवण्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मात्र, काँग्रेसला अद्यापही येथे यश मिळवता आले नाही. काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव झाला. त्यामुळे ही जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यास संधी दिली तर आपण निवडणूक लढायला तयार आहोत. तसेच, इंडिया आघाडीने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
…तर सून विरुद्ध सासरे
पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. विशेष म्हणजे रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असली तरी त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्येच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यास 2024मध्ये रावेरमध्ये सून विरुद्ध सासरे अशी लढत बघायला मिळू शकते.
Join Our WhatsApp Community