अजित दादा – राऊत यांच्यातील वाद मिटता मिटेना! मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

पदोन्नतीच्या आरक्षणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील हे दोन्ही नेेते आमने-सामने असल्याने, मुख्यमंत्र्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

अजित दादा… राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते. दादा नाराज असल्याची बातमी नुकतीच हिंदुस्थान पोस्टने दिली होती. मात्र आता याच अजित दादा आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद मिटताना दिसत नाही. आधीच मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झालेली असताना, आता पुन्हा एकदा हा वाद मंत्रिमंडळ बैठकीत डोके वर काढण्याची चिन्हे आहेत. तसे संकेतच उर्जा मंत्र्यांनी दिले. त्यामुळे या दोन नेत्यांमधील असेलले वाद हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी ठरणार आहेत.

(हेही वाचाः आता ‘दादां’चाही उद्रेक होणार का?)

वादाचे हे आहे खरे कारण

मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याची नितीन राऊत यांनी प्रेस नोटद्वारे माहिती दिली होती. तर या आरक्षणासंदर्भात मंत्री नितीन राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोट सारखा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिली. नितीन राऊत यांनी याबाबतची प्रेस नोट जारी केल्याने अजित पवार नाराज झाले होते. मात्र आता हा वाद इतका टोकाला गेला, की नितीन राऊत आता जाहीरपणे राज्य सरकारलाच धमकी देऊ लागले आहेत.

राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी

या प्रकरणी उर्जा मंत्री नितीन राऊत इतके नाराज झाले आहेत, की त्यांनी थेट ठाकरे सरकारलाच इशारा दिला आहे. मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणाच्या विषयावर काँग्रेस पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही आणि कोणी आम्हाला गृहीत धरू नये असा इशाराच त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर या विषयावर मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसांत बैठक न घेतल्यास मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दलित मागासांची मते हवीत, मात्र त्यांच्या हिताच्या विरुद्ध भूमिका घ्यायची हे कदापिही चालणार नाही, असे देखील ते म्हणाले.

(हेही वाचाः महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नका, अजित दादांचा दम!)

अजित पवारांवर राऊत नाराज

विशेष म्हणजे नितीन राऊत हे या प्रकरणावरुन अजित पवार यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. पवार जर मंत्रिमंडळ उपसमितीचे सर्व अधिकार आपल्यालेच आहेत असे समजत असतील, तर हा उपसमितीचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची होणार दमछाक

आधीच मराठा आरक्षण, राज्यातील कोरोना परिस्थिती यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डोक्याचा ताप वाढला असताना, आता मागासवर्गीय पदोन्नतीच्या आरक्षणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील हे दोन्ही नेेते आमने-सामने असल्याने, मुख्यमंत्र्यांची या दोन्ही नेत्यांमधील वाद सोडवण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री हा वाद कसा मिटवणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचाः लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार? ठाकरे सरकारच आहे संभ्रमात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here