राज्यात शिवसेना – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारला लवकरच दोन वर्षे देखील पूर्ण होतील, मात्र तरी देखील या सरकारमध्ये आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले होते. कधी काँग्रेसची नाराजी तर कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेनेची नाराजी समोर आली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर लेटर लिहित नाराजी व्यक्त केली होती. आता आणखी एक शिवसेना आमदार राष्ट्रवादीच्या मंत्र्यामुळे त्रस्त झाला असून, त्याने देखील थेट छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मात्र एकीकडे शिवसेनेचे आमदार नाराज असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच करत नसल्याची खंत शिवसेनेच्या आमदारांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी खासगीत बोलताना बोलून दाखवली.
तरीही पक्षप्रमुख गप्प का?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांना तसेच तिथल्या आमदारांना कवडीची किंमत मिळत नसल्याची भावना सध्या शिवसैनिकांमध्ये आहे. ही बाब वारंवार शिवसेना आमदारांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना बोलून दाखवली. तसेच काही आमदारांनी चक्क मुख्यमंत्र्यांना भेटून तशा तक्रारी देखील केल्याचे समजते, मात्र तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? असा सवाल आता आमदार दबक्या स्वरात विचारू लागले आहेत.
(हेही वाचा : आता किरीट सोमय्यांच्या रडारवर विश्वास नांगरे-पाटील!)
दरेकर म्हणाले म्हणून सेना आमदार नाराज!
दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ आपल्या आमदारांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जात आहे. तसेच अर्थखात्याकडून करण्यात येणाऱ्या निधी वाटपातही अजित पवार यांच्याकडून दुजाभाव केला जात आहे. या सगळ्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितल्यानंतर खळबळ उडाली होती.
सुहास कांदे यांचा भाजपावर आरोप
भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केले. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले. अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा तपास पोलिस आयुक्त करतील. मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला भुजबळांच्या बाजूनं श्रीलंकेवरून धमकीचा फोन आला होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
याआधी प्रताप सरनाईक यांचे पत्र
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित शिवसेनेतील नेत्यांची नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी या पत्रातून केला होता. तसेच शिवसेना फोडण्याचा डाव या दोन्ही पक्षांनी मांडला असून, असे होत असल्यास आपण भाजपशी सूत जमवलेले बरे, असे त्यांनी या पत्रातून म्हटले होते.
Join Our WhatsApp Community