महामंडळावरुन ठाकरे सरकारमध्ये ठिणगी, काँग्रेसला हवे सिडकोचे अध्यक्षपद

महत्त्वाच्या असलेल्या महामंडळावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डोळा आहे. तर शिवसेनेला देखील महत्त्वाची महामंडळे स्वत:कडे ठेवायची आहेत.

राज्यातील ठाकरे सरकारला आता दीड वर्षांहून अधिक काळ झाला असून, आता तिन्ही पक्षांना महामंडळाची घाई लागली आहे. आपल्या नाराज कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी लवकरात लवकर त्यांची महामंडळावर वर्णी लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, नुकतीच या संदर्भात बैठक देखील पार पडली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सिडको महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली आहे. महत्त्वाच्या असलेल्या महामंडळावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डोळा आहे. तर शिवसेनेला देखील महत्त्वाची महामंडळे स्वत:कडे ठेवायची आहेत.

काँग्रेसला हवे सिडकोचे अध्यक्षपद

महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला कायमच दुय्यम वागणूक मिळत असल्याने, आता सिडको सारख्या महत्त्वाच्या खात्यांवर काँग्रेसने हक्क सांगायला सुरुवात केली असून, राष्ट्रवादीने देखील यावर दावा केला आहे. नगर विकास सारखे महत्त्वाचे खाते हे शिवसेनेकडे आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील काही महत्वाची खाती आहेत. त्यामुळे सिडकोचे अध्यक्षपद आपल्याला मिळायला हवे, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.

(हेही वाचाः नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद पेटला! पनवेलकडे येणारे मार्ग बंद! )

राष्ट्रवादीने नावंही ठरवले

एकीकडे काँग्रेसने सिडकोच्या अध्यक्षपदाची मागणी केली असताना, राष्ट्रवादीकडून मात्र सिडको महामंडळाच्या अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत देखील झाले आहे.

म्हणून हवे काँग्रेसला सिडकोचे अध्यक्षपद

सिडको हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी सिडको लागली आहे. त्यामुळे या महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे.

(हेही वाचाः अखेर महाविकास आघाडीचे ठरले! नाराजी दूर करण्यासाठी हा काढला मार्ग!)

म्हाडाचे अध्यक्षपद शिवसेना स्वत:कडे ठेवणार?

एकीकडे सिडकोच्या अध्यक्षपदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली असताना शिवसेनेने मात्र म्हाडाचे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत हे म्हाडाचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलेल्या संजय राऊत यांच्या भावाची मंत्रिमंडळात वर्णी देखील लागली नव्हती. मात्र, आता त्यांची महामंडळावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here