विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीत बिघाडी

140

राज्यात झालेल्या सत्तांतराचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर विरोधी बाकांवर बसाव्या लागलेल्या महाविकास आघाडीमध्ये आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला देण्यात आल्यामुळे आता काँग्रेसकडून नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे. काँग्रेसला न विचारताच शिवसेनेने परस्पर याबाबतचा निर्णय घेतल्याचे काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये नाराजी

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष इच्छुक होते. पण विधान परिषदेतील आमदारांचे संख्याबळ बघता शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची धुरा देण्यात आली. पण आम्हाला न विचारताच शिवसेनेने परस्पर हा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये स्वाभाविकच यामुळे नाराजी आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. पण सभागृहात ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांनाच विरोधी पक्षनेते पद देण्यात येते हा नियम असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितली आहे.

(हेही वाचाः विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड)

दानवेंची निवड

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडल्यानंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी दानवे यांना निवडीचे पत्र दिले आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात विधान परिषदेत सत्ताधारी शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने पहायला मिळणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.