राज्यात दिव्यांग मंत्रालय स्थापन करावे, अशी सातत्यपूर्ण मागणी करणाऱ्या बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यास प्राथमिक मंजूरी दिली. यानिमित्ताने बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील आपले मंत्रिपदही निश्चित केल्याच्या चर्चा आहेत.
( हेही वाचा : T20 World Cup: प्लेअर ऑफ टूर्नामेंटसाठी ९ नावे जाहीर! भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश, येथे करा VOTE)
अपक्ष आमदार असूनही ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडू यांना शालेय शिक्षण आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, मंत्रिपदाचा त्याग करून त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी अशा होती. परंतु, अन्य अपक्ष आमदार नाराज होण्याच्या शक्यतेमुळे आयत्या वेळेस त्यांचा पत्ता कापला गेला. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याचे आश्वासन त्यांना त्यावेळी देण्यात आले.
आता हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जी संभाव्य नावे समोर येत आहेत, त्यात कडू यांचा समावेश असला, तरी पदे कमी आणि इच्छुक अधिक, अशी स्थिती आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणाचा पत्ता कापला जाईल, हे सांगता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन बच्चू कडू यांनी रवी राणांच्या विधानाआडून दबावतंत्राचा अवलंब करून पाहिला. त्याचे फलित म्हणून मतदारसंघात ५५० कोटींचा जलसिंचन प्रकल्प आणि दिव्यांग मंत्रालयास मंजुरी मिळाली. त्यानंतर आता नव्याने स्थापन झालेल्या दिव्यांग मंत्रालयाला बच्चू कडू यांच्या शिवाय अन्य कोणी न्याय देऊ शकणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी मंत्रिपद केले पक्के केल्याचे बोलले जात आहे.
कॅबिनेट की राज्यमंत्रिपद?
महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. ते सोडून शिंदे यांना पाठिंबा दिल्याने आता कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, असा त्यांचा आग्रह आहे. परंतु, सध्या शिंदे गटाच्या वाट्याला असलेली कॅबिनेट मंत्रीपदे आणि नाराजांची संख्या पाहता कडू यांच्या गळ्यात पुन्हा राज्यमंत्री पदाचीच माळ पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community