दीपावलीनिमित्त दादरसह मुंबईतील अनेक भागांमध्ये विविध राजकीय पक्षांकडून कंदील लावण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह, पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा विभागातील जनतेमध्ये आपली ओळख पटावी म्हणून विविध राजकीय पक्षांच्यावतीने तसेच त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्यावतीने कंदिल लावून जनतेचे लक्ष वेधले जात आहे. मात्र, हे कंदील लावताना दीपावलीच्या मुळ सणाला हरताळ फासला जात असून बहुतांशी ठिकाणी कंदीलमध्ये दिवेच लावले नसून केवळ शोभेचे कंदिलच लटकावण्यात आले आहेत. त्यामुळे हे कंदिल दीपावलीसाठी लावले जातात की पक्षाची आणि आपली जाहिरातबाजी करण्यासाठी असा सवाल आता जनतेकडून केला जात आहे.
दिवाळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो आणि याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. दिवाळी या शब्दात दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाश कंदीलाचे विशेष महत्व होते. दीपावली हा दिव्यांचा सण असून आकाश कंदिलाला धार्मिक महत्व असल्याने आजच्या प्रगतशील जीवनामध्ये आकाश कंदिलांमध्येही दिवे लावणे ही आपली प्रथा आहे. परंतु या आकाश कंदिलाच्या माध्यमातून दिवे लावण्याच्या प्रथेला आता काही राजकीय मंडळींकडून फाटा दिला जात असल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये दादरसह विविध भागांमध्ये दीपावलीच्या शुभेच्छा देणारे आकाश कंदील लावण्यात आले आहेत. हे आकाश कंदिल लावण्याची स्पर्धाच जणू काही भारतीय जनता पक्ष, शिवसेना उध्दव ठाकरे गट, बाळासाहेबांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुरु आहे. पण दीपोत्सवाच्यादृष्टीकोनातून हे कंदील लावले जात नसून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी हे कंदील लावण्याची स्पर्धा असल्याने या दिवाळीच्या सणाला आपल्या प्रथा आणि परंपरेपासून दूर नेले जात आहे,अशा प्रकारची भावना निर्माण व्हायला लागली आहे. विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या आकाराचे आकाश कंदील लावले जात असले तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिव्यांची व्यवस्था नाही की ज्याद्वारे आकाश कंदिलाच्या दिव्यातून प्रकाश निर्माण होईल. अनेक कंदिलांमध्ये दिव्यांची व्यवस्था न केल्यामुळे ते केवळ राजकीय पक्षाच्या जाहिरातबाजीसाठी लावले गेले असावेत असा समज आता लोकांचा होऊ लागला असून अशाप्रकारे दिव्यांशिवाय आकाश कंदील लावण्याऐवजी अशा राजकीय पक्षांनी कंदीलच लावू नये अशाप्रकारची तीव्र भावनाही जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
दादरमध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गट, मनसे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्यावतीने मोठ्याप्रमाणात एल जे रोड, वीर सावरकर मार्ग, जावळे मार्ग, भवानी शंकर रोड, गोखले रोड आदींसह छोट्या मोठ्या रस्त्यांवर राजकीय पक्षांकडून कंदील लावले असले तरी मोजक्याच कंदिलमध्ये विजेचे दिवे लावलेले पहायला मिळत आहेत, तर उर्वरीत सर्व कंदील हे दिखाव्याकरता लावले असून या कंदिलाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करणाऱ्या राजकीय पक्षांनी यातील दिव्यांचा प्रकाश आकाश कंदिलाच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या नावावर आणि नेत्यांवर पाडून घेण्याची इच्छा दिसत नाही,असे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community