एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. सुमारे 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी 22 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून सादर केलेली अतिरिक्त कागदपत्रे रेकॉर्डवर घेतली आहेत.
काय आहे मागणी?
नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरु ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. मलिक यांच्यावर प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांवर आपल्या कुटुंबियांबद्दल जे बदनामीकारक मजकूर प्रसारित करत आहेत, त्यावर बंदी आणावी, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
(हेही वाचा समीर वानखेडे मुस्लिमच! नोकरी सोडावी लागेल! नवाब मलिकांचा दावा)
नवाब मलिक यांचा आरोपांचा धडाका
नवाब मलिक यांनी गुरुवारी समीर वानखेडे यांच्यावर तीन गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला.