शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा; संभाजीराजे छत्रपतींची मागणी

199

बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे होते, तसे ते फिरले नसल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सुपीक, तरीही सगळ्यात जास्त आत्महत्या राज्यात का?

संभाजीराजे पुढे म्हणाले की, नववर्षाच्या निमित्ताने सरकारने अडचणीत असलेल्या बळीराजाला मदत करायला पाहिजे. मागणी झाली की, मदत होऊ नये. उलट लाँग टर्म मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सुपीक असताना सगळ्यात जास्त आत्महत्या राज्यात का होतात? जे २५ वर्षांपूर्वी नियोजन केले, त्याच पद्धतीने चाललो आहे, नवीन काही नाही. मी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांना त्यांनी विविध योजना दिल्या आहेत. २४ तास वीज देत आहेत. ते समजून घेतले आणि त्याचसाठी त्यांची भेट घेतली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण महाराष्ट्र सरकारने हाती घेणे खूप आवश्यक आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

स्वराज्य संघटना २०२४ मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभारेल!

स्वराज्य संघटनेबाबत ते म्हणाले, गरीब, शेतकरी यांची स्वराज्य संघटना आहे. ही संघटना राजकारणात येणार यामध्ये काहीही दुमत नाही. स्वराज्य संघटना २०२४ मध्ये राजकारणाची विजयी गुढी उभारेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. स्वराज्य हे सुराज्य व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराजांनी जे सुराज्य केले तसे दोन टक्के जरी काम करता आले तर ते भाग्य आहे. नवी मुंबईत खूप मोठ्या जोरात सभा होणार आहे. लोकसभेसाठी नाशिक, संभाजीनगर आणि आता कोल्हापुरातून देखील लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली जात असेल, तर चांगली गोष्ट आहे. संपूर्ण राज्यात जायचे आहे. आता तरी आम्ही एकटे चाललो आहोत, ज्यांना सोबत यायचे आहे त्यांना घेऊन पुढे जाऊ. जे जे स्वतःच नेतृत्व घडवतात त्या सगळ्यांना राज्याचे नेतृत्व करण्याचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.