राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून अश्लाघ्य भाषेत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहात क्षमा मागावी किंवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. या वेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे सदस्य हरिभाऊ बागडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी विधानसभेच्या अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत येऊन सत्ताधारी आणि विरोधक यांनी घोषणा दिल्याने सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले.
नितेश राणे यांनी तात्काळ क्षमा मागावी
प्रारंभी नाशिक येथील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे म्हणाले की, यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा मी असे बोलणार आहे, असे म्हटले होते; मात्र २ दिवसांपूर्वी पुन्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून त्यांचे नातू आदित्य ठाकरे हेही आमच्यासाठी दैवतच आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा खपवून घेतली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे लहान असले, तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणे योग्य नाही. मोदी यांच्याविषयी अंगविक्षेप वक्तव्य केल्यानंतर भास्कर जाधव यांनी क्षमा मागितली होती. आता नितेश राणे यांनी तात्काळ क्षमा मागावी अथवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली. या वेळी शिवसेनेचे सदस्य सुनील प्रभू यांनी कांदे यांचे समर्थन केले.
(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध)
निलंबित करा
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, सभागृहामध्ये ३ दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृह यांनी मला क्षमा मागायला सांगितले. त्यानंतर मी क्षमाही मागितली; पण आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायर्यावर बसून विरोधांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उपदेश दिला. असे वर्तन करू नये असे त्यांच्या पक्षातील नेतेही म्हणाले होते. तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते. त्यामुळे अशा सदस्याला कायमस्वरूपी निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
निलंबनाची कारवाई झाली, तरी आम्ही लढू
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच आम्ही समर्थन करत नाही. यापूर्वी सदस्य भास्कर जाधव अन्न आणि प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांना पाहून ‘हुप हुप’ करत होते. याचेही समर्थन होऊ शकत नाही. एखाद्या आमदाराला ठरवून निलंबित करणार असाल, तर ते लोकशाहीला धरून नाही. आधी तुम्ही भाजपचे १२ आमदार १ वर्षासाठी निलंबित केले. आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई झाली, तरी आम्ही लढू. सरकार पालटत असतात. एकदा तुम्ही जर पायंडा पाडला, तर पुढील काळात विरोधक उरणार नाहीत आणि लोकशाहीची हत्या होईल. आमचे १२ सदस्य निलंबित झाले असून सर्वोच्च न्यायालयात गेल्याचा आनंद नाही. आमच्यावर ही वेळ आणली जात आहे. येथे कायदा आणि संविधान मानले जात नाही. १-१ वर्ष निलंबन करणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. सभागृहात गोंधळ चालतो, अशी त्यांची भावना होऊ नये. बैठक घेऊन या विषयावर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण…
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीच्या प्रारंभी विरोधकांकडून पायर्यांवर आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. या वेळी आमदार नितेश राणे हे इतर भाजपच्या आमदारांसमवेत आंदोलनात सहभागी झाले होते. त्या वेळी भाजप आमदारांकडून पायर्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असतांना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असतांना नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज देण्यास प्रारंभ केला. या वेळी भाजपचे काही सदस्य हसले. या घटनेनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीने नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community