टास्क फोर्स काय कागदी घोडे नाचवायला आहे का? काय म्हणाले दरेकर

राज्यात सर्वत्र आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे, आरोग्य व्यवस्था नीट करणे गरजेचे असताना, सरकारला याबाबत चर्चा करायलाही वेळ नाही.

82

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. केवळ कोरोना रुग्णांची संख्याच नाही तर राज्यातील रुग्णालयांची स्थिती देखील भयंकर आहे. रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच राज्यात आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे. अनेक धक्कादायक गोष्टी घडत असताना राज्यातली कोरोना टास्क फोर्स काय करत आहे? टास्क फोर्स फक्त कागदी घोडे नाचवायला आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ

श्री घाटकोपर वागड विशा ओसवाल समाज पुरस्कृत कोविड-१९ सीसीसी-२ केंद्र उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मंगळवार १३ मार्चला दरेकर यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते बोलत होते. आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा असून राज्यात बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर व ऑक्सिजन साठा नसल्याचे दरेकर यांनी सांगून, अनेक घटना समोर आणल्या. वसई-विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या १२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी विक्रमगडला रुग्णालयात ६३ रुग्ण असताना, ऑक्सिजन साठा नसल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर साठा उपलब्ध झाला, ठाणे येथे ऑक्सिजन अभावी २६ जणांना शिफ्ट करण्यात आलं, अनेक रुग्णालयात बेड्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना खुर्चीवरच ऑक्सिजन पुरवला जात असल्याचं भयंकर चित्र पहायला मिळालं. या सर्व घटना राज्याच्या दृष्टीने भयानक व दुर्दैवी आहेत. राज्यात सर्वत्र आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे, आरोग्य व्यवस्था नीट करणे गरजेचे असताना, सरकारला याबाबत चर्चा करायलाही वेळ नाही. त्यामुळे राजकीय टीका-टिप्पणी करण्यात वेळ न घालवता आरोग्य व्यवस्था मजबूत करावी, अशी भावना दरेकर यांनी व्यक्त केली.

(हेही वाचाः ‘वसुली’साठी काय पण… क्लीन-अप कडून कसे पूर्ण केले जाते ‘टार्गेट’? वाचा…)

सरकारमध्ये नियोजनाचा अभाव

कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोना प्रतिबंधक लसींचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. राज्यात आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा असून कोणत्या गोष्टीचा साठा लागेल त्याचं अगोदरच नियोजन होणे आवश्यक होते. पण आयत्या वेळेला विहीर खोदण्याचे काम राज्य सरकार व प्रशासन करत असल्याची टीका दरेकर यांनी केली.

लोकांचे जीव वाचवा

मृत्यूच्या नोंदीबाबत बोलताना दरेकर म्हणाले, महापालिकेमध्ये ५७ मृत्यूंची नोंद आहे तर स्मशानभूमीत ३०१ रुग्णांची नोंद आहे. यासाठी केवळ राज्य सरकार जबाबदार नसून प्रशासकीय यंत्रणा सुद्धा बेफिकीर आहेत. दमणला असताना सचिव सौरभ विजय यांना दोन वेळा फोन करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना दोन-तीन वेळा फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला पण त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्यास नकार देऊन त्या मालकांना आम्हाला संपर्क करण्यास सांगितले. त्यामुळे हे प्रशासन बेफिकीर असून राज्य सरकारने बारकाईने लक्ष घालावे तसेच आरोग्य व्यवस्था वाढवावी व आवश्यक तेवढा खर्च करुन लोकांचा जीव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी विनंतीही दरेकर यांनी केली.

(हेही वाचाः राज्यात कधीही जाहीर होणार लॉकडाऊन… आजच नियमावली तयार होणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.