देवेंद्र फडणवीसांच्या सहमतीशिवाय घोषणा करू नका; मुख्यमंत्र्यांची स्वपक्षातील मंत्र्यांना सूचना

154

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीशिवाय आर्थिक बाबींची घोषणा करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातील मंत्र्यांना केली आहे. शासकीय दायित्वे आणि राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीची सांगड घालणे कठीण जात असल्यामुळे फडणवीसांनी वारेमाप घोषणा न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिंदे यांनी मंत्र्यांना ही सूचना केल्याचे कळते.

( हेही वाचा : चैत्यभूमीसह शिवाजीपार्कमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका सेवा सुविधांसह सज्ज)

अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईबाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गिरीश महाजन तसेच इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू झाली, तेव्हा फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांसमोर वित्तीय स्थिती नाजूक असल्याची व्यथा मांडली. भरपाई द्यायलाच हवी, त्यात दुमत नाही. मात्र राज्याच्या तिजोरीवरचा भार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या कल्याणकारी योजना तसेच विकासाच्या प्रकल्पांना खीळ बसेल. अशा प्रकारे मदतीच्या घोषणा सर्वसमावेशक विचार केल्याशिवाय करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

त्यानंतर, फडणवीसांनी दिलेला सल्ला गांभीर्याने घ्या, आर्थिक बाबींची घोषणा करताना त्यांची सहमती घ्या, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातील मंत्र्यांना केली.

सत्तारांचे टोचले कान

कृषिमंत्री अब्दुल सत्तार या बैठकीला उपस्थित होते. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी व इतर नागरिक फार आक्रमकतेने आमच्याशी बोलतात, असे सांगत त्यांनी निधीचा आग्रह धरला. मात्र, राजकारण कोळून प्यायलेल्या फडणवीसांनी सत्तारांना तत्काळ खोडून काढले. ‘अहो सत्तार, तुम्ही स्वतःच इतके आक्रमक असता तुमच्यापेक्षा कोण अधिक आक्रमक होणार?’, अशा शब्दांत फडणवीसांनी सत्तारांचे कान टोचले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.