गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ बुधवारी होत आहे, हे हक्काचे घर मिळवण्यासाठी जो संघर्ष केला आहे, तो विसरु नका आणि हा संघर्ष वायादेखील जाऊ देऊ नका, त्यासाठी मिळालेली ही घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासीयांना घातली.
बांधकामाचा शुभारंभ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवन येथे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह प्रमुख प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
( हेही वाचा: …म्हणून एसटीच्या विलीनीकरणावर अद्याप निर्णय नाही! )
मुंबईकरांचे स्वप्न
पत्राचाळ हा विषय अनेकांच्या माहितीचा आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न रखडला होता, आंदोलने, उपोषणे झाली आणि अखेर हा प्रश्न आज मार्गी लागला आहे, हा क्षण पहायला पत्राचाळीतील जे रहिवासी आज हयात नाहीत, त्यांना मी अभिवादन करतो. पत्राचाळीचा प्रश्न सोडवण्याची मागणी घेऊन संघर्ष समितीला दिलेले वचन आज पूर्ण केले असून अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज होत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. कॅबिनेटमध्येही या विषयाला त्यांनी नेहमी वाचा फोडली असे सांगून कामं अनेक असतात, मुंबईत हक्काचं घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यादृष्टीने आजचा शुभ दिन आहे. चिकाटी आणि जिद्द असली की काही करता येते, हे या कामातून दिसते. अनेकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यांचे किमान हक्काचं घर असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न या कामाच्या निमित्ताने पूर्ण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community