आजचा दिवस हा चांगला आहे. उद्धव ठाकरे यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. ते पक्षप्रमुख आहेत. त्यांना दिलेल्या शुभेच्छा त्यांनी स्वीकाराव्यात. आमच्या गटाच्या सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यास सांगितल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. हे पद सन्मानजनक आहे. त्यातून कुणीही गैर अर्थ काढू नये, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी जन्म दिनाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छावरून जो वाद उमटला त्यावर पडदा टाकला.
चुकीचे शब्द वापरू नका
आदित्य ठाकरे वारंवार शिंदे गटातील आमदारांना ‘परत निवडणुकीला सामोरे जा’, असे म्हणत आहेत. तुम्हाला जेव्हा लोकांनी भाजप-शिवसेना युती म्हणून निवडून दिले, त्यानंतर तुम्ही दोन्ही काँग्रेस बरोबर गेलात, तेव्हा तुम्ही परत निवडणुकीला सामोरे गेलात का, असे सांगत तुमच्या मतदारसंघात दोन आमदार केले, विधानसभेत तुम्ही स्वतः आहात आणि परिषदेवरही त्याच मतदार संघातून आमदारकी दिली, हा तुमचा निर्णय आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले. एकीकडे तुम्ही आम्हाला ‘परत या’ म्हणता आणि दुसरीकडे आमचा अवमानकारक उल्लेख करता. आम्ही ज्या झाडाखाली सावली घेतली, त्याच सावलीत तुम्हीही मोठे झाला आहेत. त्यामुळे चुकीचे शब्द वापरू नका, असेही केसरकर म्हणाले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ का म्हटले नाही? या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे)
कोविड काळात एकनाथ शिंदे यांचे योगदान अधिक
कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी ग्राऊंडवर काम केले. एक – एक हजार खाटांचे कोविड सेंटर स्वखर्चाने बनवले आहे, त्यामुळे त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन कॉन्सेंटेटर मागवले होते. त्या कामाचे त्यांनी पक्ष पप्रमुखांना श्रेय दिले. शिंदेंना दोन वेळा कोविड झाला होता, तरीही त्यांनी काम केले. समर्पित काम केले. या कामाचे श्रेय ते पक्षाला समर्पित केले, असेही केसरकर म्हणाले. जेव्हा युतीचे शासन होते तेव्हा कमी गंभीर आजाराला १ लाख रुपये आणि गंभीर आजाराला ३ लाख रुपये देत होते. त्यानंतर निर्णय बदलला. मात्र पुन्हा कमी गंभीर आजारासाठी १ लाख रुपये आणि गंभीर आजारासाठी ३ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Join Our WhatsApp Community