कोरोना नियंत्रणाचे आभासी चित्र उभे करू नका! देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने होतो आहे. मुंबईची आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता 1 लाख आहे, तेथे केवळ 34,191 चाचण्या प्रतिदिन केल्या जातात, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

120

मुंबईतील कोविड मृत्यूची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे, हे प्रकार तात्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

मृत्यूंची नोंद चुकीच्या पद्धतीने होतेय! 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोविड संदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.7 टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के तर मुंबईत 12 टक्के इतके होते. मार्च 2020 ते 30 एप्रिल 2021 या काळात मुंबईत 1,593 इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत, जे प्रमाण एकूण मृत्यूच्या 12 टक्के आहे. दुसर्‍या लाटेत तर 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या काळात 1,773 पैकी 683 मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे.

चाचण्या कमी केल्या जातात!

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान 1 लाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी 34,191 इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. (गेल्या 10 दिवसांतील सरासरी) आणि त्यातही 30 टक्के या रॅपिड अँटीजेन प्रकारातील आहेत. आयसीएमआरने 30 टक्के रॅपिड अँटीजेन चाचण्या मान्य केल्या असल्या तरी त्या केवळ जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही अशा ठिकाणासाठी आहे. जेथे आरटीपीसीआरची पूर्ण क्षमता आहे, तेथे हे प्रमाण 10 टक्क्यांच्या वर असता कामा नये. रॅपिड अँटीजेन चाचण्यांची कार्यक्षमता ही 50 टक्क्यांहून कमी असल्याने त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत तर भर पडते व संसर्ग दर हा कृत्रिमपणे कमी होत जातो. 7 मे 2021 रोजी एकूण 45,726 इतक्या चाचण्या झाल्या, यातील रॅपिड अँटीजेन चाचण्या 14,480 इतक्या होत्या. हे प्रमाण 31.67 टक्के इतके असताना मुंबईचा संसर्ग दर 7.6 टक्क्यांवर आला. 8 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 43,918 इतक्या झाल्या. यातील 13,827 रॅपिड अँटीजेन चाचण्या होत्या. हे प्रमाण 31.48 टक्के इतके असताना संसर्ग दर हा 6.9 टक्क्यांवर आला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण केले कमी!

रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण एकूण चाचण्यांमध्ये कमी असल्यास काय परिणाम होतो, हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी काही उदाहरणे दिली आहेत. 3 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 26,586 झाल्या, त्यात रॅपिड अँटीजेन चाचण्या 4453 होत्या. म्हणजे एकूण चाचण्यात रॅपिड अँटीजेनचे प्रमाण 17 टक्के. त्यादिवशी संसर्ग दर 11.3 टक्के होता. 4 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 31,125 इतक्या झाल्या. त्यात रॅपिड अँटीजेन 7073. म्हणजे 22 टक्के. यादिवशी संसर्ग दर हा 9.1 टक्के इतका आला. म्हणजेच रॅपिड अँटीजेन कमी केल्या तर संसर्ग दर वाढतो आणि त्या वाढविल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होते. यातून हे अतिशय स्पष्ट होते की, संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतू अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल, ही बाब वेगळी.

पीआर संस्थेच्या वतीने बनवाबनवी थांबवा!

मुंबईतील प्रशासन आणि अधिकारी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न मला अजिबात कमी लेखायचे नाहीत. किंबहूना त्याची मी नोंद घेतो आहे. मुंबईतील कोरोना संसर्गाचा आलेख स्थिरावतोय, (प्लाटू होतो आहे) ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. परंतू, आयआयटी कानपूरचे प्रो. मणिंदर अग्रवाल यांनी सांख्यिकी अभ्यासाच्या आधारावर यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मुंबईत कोरोना संसर्गाचे शिखर (पिकिंग) उर्वरित देशाच्या तुलनेत आधीच म्हणजे एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यातच गाठले व त्याच मॉडेलप्रमाणे आता तो स्थिरावताना दिसतो आहे आणि यानंतर तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये घडले त्याप्रमाणेच पुणे तथा नागपूर याही ठिकाणी प्लाटुईंगची स्थिती दिसून येते आहे. (अर्थात नागपूर या सरकारच्या नजरेतून दूर असताना देखील तेथेही हे घडते आहे) आता आपण म्हणतोय की, आपण तिसर्‍या लाटेसाठी सज्ज होतोय्, तर अशावेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केले जातेय, ते पूर्णत: दिशाभूल करणारे आणि कोरोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघर्षाला कमकुवत करणारे आहे. ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तात्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.