- चंद्रशेखर साने
डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) २ जानेवारी १९४० या दिनांकाला कराडच्या संघ शाखेला भेट देण्यास गेले नसून ३ जानेवारी १९४० ला गेले होते. डॉ. याबाबत काही पुरावे समोर आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी कराड येथील संघ शाखेला भेट दिली होती. त्याविषयी केसरीच्या समकालीन वृत्तपत्रात मजकूर छापून आलेला आहे.
केसरी वृत्तपत्रात छापून आल्याप्रमाणे “तारीख २ जानेवारी रोजी बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar) हे कराड येथे गेले असताना तेथील म्युनिसिपालिटीतर्फे मानपत्र देण्याचा समारंभ झाला. यानंतर त्यांनी तेथील रा. स्व. संघाच्या शाखेस भेट दिली. याप्रसंगी भाषण करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो.”
या बातमीत पूर्णपणे सत्यता आहे. कारण कोणत्या तरी भविष्यकालीन फायद्या/तोट्याची अशी बातमी देते वेळी बातमीदाराला काही कल्पना असण्याची शक्यताच नाही. एक सर्वसामान्य दैनंदिन घटना या समजूतीनेच ती चार ओळीत केसरी वृत्तपत्राने छापली आहे.
(हेही वाचा आता टप्प्याटप्प्याने देता येणार पैसे; MHADA ची चार हजार घरांची Lottery निघणार; जाणून घ्या सविस्तर माहिती )
याचा खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रात काही उल्लेख मिळतो का, याचा मागोवा घेतला असता २ जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar) हे कोल्हापुरात होते आणि ३ जानेवारीला सकाळी कराड येथे येण्यास निघाले, असा उल्लेख सापडला. ३ जानेवारी १९४० ला बुधवार होता. त्यादिवशी डॉ. बाबासाहेब येत असताना त्यांच्या मोटारीला एक छोटासा अपघात झाला. ते मोटारी बाहेर फेकले गेले, परंतु सुदैवाने किरकोळ दुखापतीशिवाय त्यांना काही लागले नाही. त्यानंतर त्यांना तेथील रुग्णालयात आणण्यात आले आणि दोन तासाच्या उपचारानंतर सोडण्यात आले. त्यानंतर सहकारी नको म्हणत असतानाही ते कराड नगरपालिकेत मानपत्र घेण्यास गेले व त्यांनी भाषणही केले.
त्यानंतर 3 जानेवारीची संपूर्ण संध्याकाळ त्यांनी कराडमध्ये थांबून काय केले याविषयी त्यांचे चरित्रकार खैरमोडे यांनी मौन बाळगले आहे. त्यांना कदाचित ती गोष्ट अज्ञात असेल किंवा संघ शाखा भेट हे फार महत्त्वाचे वाटले नसावे. त्याविषयी आपण तर्क करण्यात अर्थ नाही, परंतु खैरमोडे यांच्या चरित्रात न आलेला हा मधला काळ केसरीने भरून काढला आहे. मात्र त्याबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या या भेटीचा हा दिनांक २ जानेवारी नसून ३ जानेवारीच असल्याचे सिद्ध होते. अन्य वृत्तपत्रात सुद्धा (अमृत बाजार पत्रिका आणि बॉम्बे क्रॉनिकल) अपघाताच्या बातम्या आल्या आहेत त्या ३ जानेवारी बुधवार याच्याशी जुळतात.
हा सगळा दिनक्रम पाहता ३ जानेवारी या दिवशी डॉ. बाबासाहेब (Dr. Ambedkar) कराडमध्ये आले, त्यांना लहानसा अपघात झाला, रुग्णालयाच्या दोन तास उपचारानंतर तेथून ते मानपत्र घेण्यास गेले. असा घटनाक्रम जुळतो. दुसऱ्या दिवशी ते परतीच्या प्रवासाला निघाले.
संध्याकाळी त्यांनी नक्की काय केले मधला रिकामा वेळ कसा काढला ही बाब केसरीच्या बातमीने भरून निघत आहे. ती यापुढील डॉ. आंबेडकर चरित्रात सहज घेता येण्यासारखी आहे.
इतिहासाचा अभ्यासक म्हणून हे बारकावे सुद्धा मला महत्त्वाचे वाटतात. या दिवसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक कार्यक्रम सुद्धा २ जानेवारी २०२५ ला पार पडला. ऐतिहासिकदृष्ट्या अचूकतेच्या दृष्टीने पुढील वर्षापासून ३ जानेवारी या दिवशी तो साजरा व्हावा, अशी माझी नम्र सूचना आहे.
(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यासक आहेत.)
Join Our WhatsApp Community