नायगाव (दादर) येथील बीडीडी (BDD) चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकल्पाला त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले होते. आव्हाड यांच्या निर्णयावर विद्यमान सरकारने फुली मारले आहे.
वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडीच्या काळात देण्यात आलेले ‘बी.डी.डी. (BDD) चाळ, नायगाव-श्री. शरद पवार नगर’ हे नाव हटवून या चाळीचे ‘बी.डी.डी. चाळ, नायगाव-डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी.डी.डी. संकुल’ असे नामकरण करण्याची मागणी त्यांनी केली होती. शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी गृहनिर्माण विभागाने त्यांची ही मागणी मान्य करीत शासन आदेश जारी केला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या काळात या चाळीला शरद पवार यांचे नाव देण्यात आले होते; मात्र काही स्थानिकांनी शरद पवार यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी बी.डी.डी. (BDD) संकुलाला असलेले शरद पवार यांचे नाव हटवून संकुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीवरून हे नामांतर करण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे.
Join Our WhatsApp Community