श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये पुसटशी रेषा असते, त्यामुळे समाजासाठी चांगली असते ती श्रद्धा आणि वाईट असते ती अंधश्रद्धा असते. मेळघाटात बालमृत्यूचे प्रमाण वाढलेले होते तेव्हा तेथील आदिवासींचा मांत्रिक, भगताकडे घेऊन गेले कि बरे होते, असा समज असायचा. तेव्हा सरकारने त्या मांत्रिकांनाच दवाखान्यात आणून बसवले आणि त्याच्याकडे येणाऱ्या आदिवासींच्या मुलांवर त्याचे त्याचे उपचार करायला सांगितले, त्याच वेळी डॉक्टरही त्या मुलांवर उपचार करु लागले. त्यासाठी मांत्रिकाला प्रत्येक रुग्णामागे १०० रुपये देणे सुरु केले, याला डॉ. दाभोलकरांनी विरोध केला. मुले तडफडत मेली तरी चालेले पण हे थांबले पाहिजे, अशी भूमिका डॉ. दाभोलकरांनी घेतली. डॉ. दाभोलकर यांनी केवळ हिंदू धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले ते मुसलमानांमधील अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करायचे. मोहनदास गांधी हेही मुसलमान जेव्हा हिंदूंवर अत्याचार करत होते तेव्हा हिंदूंनाच अत्याचार सहन करण्याचे धडे द्यायचे. म्हणूनच मुसलमानांमधील अंधश्रद्धेवर दाभोलकर काही बोलत आणि मुसलमान हिंदूंवर अत्याचार करायचे तेव्हा गांधी काही बोलत नव्हते. त्यामुळे दाभोलकर आणि गांधी हे एकच माळेचे मणी होते, असा हल्लाबोल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केला.
सातारा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात रणजित सावरकर (Ranjit Savarkar) उपस्थित होते. यावेळी या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला ३००हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर कोणाला तरी पकडणे आवश्यक होते. त्यामुळेच विक्रम भावेंसारखे अकार्यक्षम व्यवस्थेचे बळी ठरले. दरम्यान, हिंदूंनी संघटित व्हावे, जागरूक राहावे, असे आवाहन करत भावे यांना त्यांच्या जबाबावरून आठ महिन्यांनंतर अटक केली जाते, असे का? याबाबत न्यायालयाने कोणत्याच यंत्रणेला प्रश्न विचारला नाही आणि त्याचे उत्तर न्यायालयही कधी देणार नाही. कारण, ही व्यवस्थाच खिळखिळी झालेली आहे. आपले ठेवावे झाकून अन्…असे न्यायालय वागतात. हिंदूंसाठी कार्य करणाऱ्यांना दहशतवादी ठरवले जात आहे. न्यायालये राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्यांचे खटले चालविण्यासाठी वेगळी यंत्रणा असावी, अशी मागणी करतात; परंतु न्यायालयेच भ्रष्ट झाली असतील, तर ते अशी मागणी का करीत नाहीत? डॉ. दाभोलकर प्रकरणात १० वर्षे कारागृहात ठेवल्यानंतर आरोपींची निर्दाेष मुक्तता होते. यामध्ये आरोपींचे आयुष्य वाया जाते, यावर कुणीच काही का बोलत नाही?, असा सवालही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी उपस्थित केला.
अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला लढत असतानाच त्यांनाच अटक केली जाते. याविषयी न्यायालयातून कधीही उत्तर मिळणार नाही. आज ‘सभ्य’ हा शब्द ‘षंढ’ बनला आहे. बंगाल, कर्नाटक येथे हिंदु असणे गुन्हा ठरत आहे. भारतात न्यायव्यवस्था आणि प्रशासनवर्ग ब्रिटिशांनी स्थापन केला आहे. हिंदु समाज सहिष्णू झाला आहे. म्हणूनच डॉ. दाभोलकर यांचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा केवळ हिंदूंच्या विरोधात होता. भारतात आज प्रत्येक शहरात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. बंगालमध्ये याच लोकांनी हिंदूंंच्या हत्या केल्या आहेत. हिंदूंनी आज संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंनी मुसलमानांच्या ऐवजी हिंदु विक्रेत्यांकडूनच माल खरेदी करावा, असे आवाहनही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.