Dr. Swapna Patker : ‘उद्धवदादा या बहिणीला काय मदत करणार, महाराष्ट्राला नक्की सांगा’

263
Dr. Swapna Patker : ‘उद्धवदादा या बहिणीला काय मदत करणार, महाराष्ट्राला नक्की सांगा’
  • खास प्रतिनिधी

बदलापूर अत्याचार घटनेनंतर शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा निषेध करीत ‘नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा’ अशी भूमिका घेतली, त्याचे स्वागत कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार डॉ. स्वप्ना पाटकर (Dr. Swapna Patker) यांनी केले. त्याचबरोबर ‘आपल्यावर हल्ले झाले, त्यावेळी मदत मागितली, मात्र तुम्ही या बहिणीला मदत केली नाही,’ अशी आठवण पाटकर यांनी ठाकरे यांना करुन दिली आणि ‘आता तुम्ही बहिणींसाठी लढायला तयार आहात तर या बहिणीसाठी काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा,’ असे आवाहन पाटकर यांनी ठाकरे यांना लिहिलेल्या उघड पत्रात केले आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली कसोटी कर्णधार रहायला हवा होता, असं संजय बांगर यांना का वाटतं?)

पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे

पाटकर (Dr. Swapna Patker) यांनी ते पत्र X वर पोस्ट केले असून त्या लिहितात, “नमस्कार उद्धवदादा, महिला सुरक्षिततेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. ‘नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.’ असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले.”

माहित असून तुम्ही मदत नाही केली

पाटकर (Dr. Swapna Patker) पुढे म्हणतात, “मी २०१६ ते २०२१ तुम्हाला अनेक ई-मेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्या शिवाय इतर कोणा सोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले, मला वेग वेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे, माझे काम बंद करण्यात आले, घरा बाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.”

(हेही वाचा – BCCI Prize Money : देशांतर्गत क्रिकेटमध्ये बक्षिसाची रक्कम वाढणार, रणजी सामनावीराला मिळणार ‘इतके’ पैसे)

माझी वाट लावली तशीच पक्षाचीही

“माझा एक चित्रपट ‘डॉक्टर रखमाबाई’ रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले, असे मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोन वर शिव्या गाळ, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली. आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण, स्वप्ना पाटकर,” असे स्वप्ना (Dr. Swapna Patker) यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.