मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ७५ टक्के झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुलुंड ते घाटकोपर या ईशान्य मुंबईत सफाईच्या नावाने बोंबाबोंब आहे. ईशान्य मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या पाच ते सहा नाल्यांची पाहणी केली. यामध्ये नाल्यांची सफाई योग्यप्रकारे झालेलीच नसून, ज्या मोठ्याा नाल्यांमधील सफाई यांत्रिक पध्दतीने व्हायला हवी, तिथे कामगार नाल्यात उतरुन हाताने गाळ काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तो गाळ न काढता ते केवळ गाळ ओढून घेत होते, असे दिसून आले. त्यामुळे भविष्यात पूर्व उपनगरातील ईशान्य मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती भाजपने वर्तवली आहे.
दर पावसाळ्यात लोकांना त्रास
ईशान्य मुंबईतील भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी स्थानिक आमदार आणि नगरसेवकांसह लोकसभा मतदार संघातील नाल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मानखुर्द न्यू पीएमजीपी, चेंबूर लिंक रोड नाला, सोमय्या नाला, रायझिंग नाला, कांजूर कारशेडमधील भराव, बाऊंड्री नाला आणि बाँबे ऑक्सिजन नाला आदींची पाहणी केली. या प्रसंगी खासदारांनी नालेसफाई कामाचा आढावा घेतला आणि नालेसफाईचे काम नीट पूर्ण न केल्यामुळे अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मुंबईत नालेसफाईवर कोट्यावधीहून अधिक खर्च करुन देखील, दरवर्षी मुंबई उपनगरात पाणी भरते आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. दर पावसाळ्यात अपुऱ्या नालेसफाईमुळे जनतेला जो त्रास सहन करावा लागतो तो होऊ नये, यासाठी पालिकेला लवकरात लवकर उपाययोजना करण्यच्या सूचना दिल्या.
(हेही वाचाः महापालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला बोगस! अतुल भातखळकरांचा आरोप)
याप्रसंगी आमदार पराग शहा, महापालिकेचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक प्रकाश गंगााधरे, नगरसेविका रजनी केणी, नगरसेविका सारिका मंगेश पवार, नगरसेविका जागृती पाटील, स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी आणि भालचंद्र शिरसाट, नगरसेविका साक्षी दळवी, नगरसेविका समिता कांबळे, नगरसेविका वैशाली पाटील व भाजप कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईत कुठल्याही नाल्यांमधील सफाई समाधानकारक पहायला मिळाली नाही. आम्ही या नाल्यांची पाहणी करायला येणार होतो, म्हणूनच कामगारांना नाल्यात उतरवले होते की काय, असे वाटत होते. सोमय्या नाल्यामध्ये तर केवळ अंगावर चड्डी वगळता काहीच नव्हते. त्या नाल्यात उतरलेले कामगार हे गाळ काढत होते, की एकमेकांना सावरत होते हेच कळत नव्हते. परंतु कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेत जो भराव टाकला आहे, त्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. यापूर्वी मिठागर आणि गवतामुळे ईशान्य मुंबईच्या पट्टयात कधी पाणी शिरत नव्हते. परंतु या भरावामुळे या भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता असून, यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरेल.
-प्रभाकर शिंदे, महापालिका भाजप गटनेते
(हेही वाचाः पश्चिम उपनगरातील ७२ टक्के नालेसफाईचा महापौरांचा दावा)
काय पाहिले नाल्यांमध्ये?
मानखुर्द पीएमजीपी नाला: काम सुरु होते, पण गाळ उचलला गेला नव्हता.
चेंबूर लिंक रोड नाला: निम्म्या पात्रात बांधकामे, निम्मा नाला अरुंद, सफाई नाही.
सोमय्या नाला: मोठा नाला तरीही पोकलेनने गाळ न काढता, १० ते १२ कामगारांकडून गाळ काढण्याचे काम सुरु. पण गाळात कामगारच अडकले जात होते.
रायझिंग नाला: काम सुरुच नाही.
घाटकोपर हायवे: काही प्रमाणात काम सुरू.
कांजूर मेट्रो कारशेडची जागाा: सिंगल पाईप टाकण्याचे काम.
बाँबे ऑक्सिजन नाला: समाधानकारक सफाई नाही.
बाऊंड्री नाला: समाधानकारक सफाई नाही.
(हेही वाचाः नालेसफाईच्या कामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस नाराज!)
Join Our WhatsApp Community