राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील.
याबाबत जे. पी नड्डा म्हणाले की, एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पूर्वांचल भागातून कुणी उमेदवार असावे, असे ठरवले होते. त्यात आदिवासी भागातील महिला नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात येत आहे. आम्हाला अपेक्षा होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, परंतु विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आधीच केले, असे नड्डा म्हणाले.
कोण आहे द्रौपदी मुर्मू?
- द्रौपदी मुर्मू ओडिशा येथील आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात.
- द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या सर्वाधिक काळ राज्यपाल राहिल्या आहेत.
- देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल आहेत.
- ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या दोनदा रायरंगपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा आमदार होत्या.
- भाजपा आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या.