नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण जसेच्या तसे…

206

देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशातील आदिवासी समुदायातून एखाद्या महिलेला राष्ट्रपतीपद मिळण्याची ही पहिलीच आणि गौरवाची बाब. याच पदाचा पदभार स्वीकारत द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी संसदेच्या सेंट्रल हॉल येथे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रपती मूर्मू यांनी केलेले भाषण जसेच्या तसे वाचा!

president1

नमस्कार!

भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.

तुम्ही मला दिलेले मत हे देशातील करोडो नागरिकांच्या विश्वासाची अभिव्यक्ती आहे. आशा, आकांक्षा आणि हक्काचे प्रतीक असलेल्या या पवित्र संसदेकडून मी सर्व देशवासीयांना विनम्र अभिवादन करते. माझी कार्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुमचा स्नेह, विश्वास आणि पाठिंबा ही माझी सर्वात मोठी ताकद असेल. देशाने मला एका निर्णायक क्षणी, देश ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत असताना राष्ट्रपती म्हणून निवडून दिले आहे. काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हा देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत होता हाही योगायोगच म्हणावा लागेल. आणि आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी माझ्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशा ऐतिहासिक वेळी जेव्हा भारत पुढील 25 वर्षांचे स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण जोमाने काम करत आहे ही जबाबदारी मिळणे हे माझे मोठे सौभाग्य आहे.

(हेही वाचा शरद पवारांची कोलांटउडी! आधी बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक नंतर टीका)

मी स्वतंत्र भारतात जन्मलेली, देशाची पहिली राष्ट्रपती आहे. स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृतकाळामध्ये जलद गतीने काम करावे लागेल. या 25 वर्षांत अमृतकालचे ध्येय साध्य करण्यासाठी सबका प्रयास और सबका कर्तव्य (प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य). या दोन मार्गांवर पुढे जायला लागेल. भारताच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने हा विकासाचा नवा प्रवास, कर्तव्याच्या मार्गाने आपल्या सामूहिक प्रयत्नातून व्हायला हवा. उद्या म्हणजेच २६ जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा करणार आहोत. हा दिवस भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी देशाच्या सशस्त्र दलांना आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देते.

president 1

स्त्री आणि पुरूषहो, देशाच्या पूर्वेकडील ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून माझा जीवन प्रवास सुरू झाला. मी ज्या पार्श्‍वभूमीतून आले आहे तिथे प्राथमिक शिक्षण घेणे माझ्यासाठी स्वप्नवत होते, पण अनेक अडथळे येऊनही माझी जिद्द कायम राहिली आणि कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी मी ठरले. मी आदिवासी समाजातील आहे. मला काम करण्यासाठी नगरसेवक ते भारताची राष्ट्रपती अशी संधी मिळाली आहे. लोकशाहीची जननी असलेल्या भारताचे हे मोठेपण आहे. दुर्गम आदिवासी भागातील गरीब घरात जन्मलेली मुलगी भारतातील सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचू शकते ही आपल्या लोकशाहीच्या शक्तीला मानवंदना आहे. मला राष्ट्रपतीपद मिळाले हे माझे वैयक्तिक यश नसून भारतातील प्रत्येक गरीब माणसाचे ते यश आहे. भारतातील गरिबांनाही स्वप्ने असू शकतात आणि ती पूर्णही होऊ शकतात याचा पुरावा म्हणजे माझी निवड आहे. शतकानुशतके वंचित राहिलेले आणि विकासाच्या लाभापासून वंचित राहिलेले गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी माझ्यात आपले प्रतिबिंब पहात आहेत ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे. माझ्या या निवडीला देशातील गरिबांचा आशीर्वाद आहे. आणि माझी ही निवड देशातील करोडो महिला आणि मुलींची स्वप्ने तसेच क्षमता प्रतिबिंबित करते.

माझी ही निवड आजच्या भारतातील तरुणांचे – (जे नवीन मार्गांवर चालण्यास आणि फसलेल्या वाटेपासून दूर राहण्यास तयार आहेत.) धाडसही दाखवते. आज अशा प्रगतीशील भारताचं नेतृत्व करताना मला अभिमान वाटत आहे. आज मी सर्व भारतीयांना विशेषतः भारतीय तरुण आणि महिलांना हे आश्वासन देत आहे कि या पदावर काम करत असताना त्याचं हित हीच माझ्यासाठी प्राथमिकता असेल.

presidet3

बंधूंनो आणि भगिनींनो,

माझ्या पुढे भारताच्या राष्ट्रपती पदाचा असा एक मोठा वारसा आहे, ज्याने भारतीय लोकशाहीची प्रतिष्ठा जगात सातत्त्याने मजबूत केली. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून ते राम नाथ कोविंद जी यांच्यापर्यंतच्या दिग्गजांनी हे पद भूषविलं. या पदाबरोबरच या महान परंपरेचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी देखील देशाने माझ्यावर सोपवली आहे. संविधानाच्या प्रकाशाखाली मी माझं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडीन. माझ्यासाठी, भारताचे लोकशाही-सांस्कृतिक आदर्श आणि सर्व नागरिक नेहमीच माझ्या उर्जेचा स्त्रोत असतील.

(हेही वाचा शिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आले का? अजित पवारांचा घणाघात)

बंधूंनो आणि भगिनींनो,

आपल्या स्वातंत्र्य लढ्याने एक राष्ट्र म्हणून भारताच्या नव्या प्रवासाचा मार्ग तयार केला होता. आपला स्वातंत्र्य लढा हा त्या संघर्षांचा आणि त्यागाचा अखंड प्रवाह होता, ज्याने स्वतंत्र भारतासाठी अनेक आदर्श आणि शक्यतांचं संवर्धन केलं होतं. पूज्य बापूंनी स्वराज्य, स्वदेशी, स्वच्छता आणि सत्याग्रहाचा अवलंब करून आपल्याला भारतीय संस्कृतीचे आदर्श जाणून घेण्याचा मार्ग दाखवला. नेताजी सुभाष चंद्र बोस, नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, भगत सिंह, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या अगणित व्यक्तिमत्वांनी आपल्याला राष्ट्राभिमान सर्वात प्रथम ठेवण्याची शिकवण दिली. राणी लक्ष्मी बाई, राणी वेलू नाचियार, राणी गाइदिन्ल्यू आणि राणी चेन्नम्मा यांच्यासारख्या शूर महिलांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्तीच्या भूमिकेनं राष्ट्राचं रक्षण आणि उभारणी करण्यात नवी उंची गाठली. संथाल क्रांती, पायका क्रांती ते कोल क्रांती आणि भिल्ल क्रांती या सर्व क्रांतींनी स्वातंत्र्य लढयातलं आदिवासींचं योगदान बळकट केलं. ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा जी यांनी सामाजिक उन्नती आणि देशाभक्तीसाठी केलेल्या बालिदानामधून आम्हाला प्रेरणा मिळाली. मला आनंद आहे, की आदिवासी समुदायाच्या स्वातंत्र्य लढयातल्या भूमिकेला समर्पित अनेक संग्रहालयं देशभर उभारली जात आहेत.

president4

बंधूंनो आणि भगिनींनो,

संसदीय लोकशाही म्हणून 75 वर्षांत भारताने सहभाग आणि सहमतीच्या माध्यमातून प्रगतीचा संकल्प पुढे नेला आहे. विविधतेने भरलेल्या आपल्या देशात, अनेक भाषा, धर्म, पंथ, खाण्या-पिण्याच्या सवयी, जीवन पद्धती आणि रूढी आपले करून आपण ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्याच्या कामात गुंतलो आहोत. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांबरोबर सुरु होणारा हा अमृत काळ भारतासाठी नवीन संकल्पांचा काळ आहे. आज मी या नव्या काळाचं नव्या विचारांसह स्वागत करण्यासाठी प्रेरित आणि तयार असलेला माझा देश पाहत आहे. भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय जोडत आहे. कोरोना महामारीच्या जागतिक संकटाचा सामना करताना भारताने ज्या प्रकारची क्षमता दाखवली आहे, त्यामुळे जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे. आम्ही भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी या जागतिक आव्हानाचा सामना केलाच, पण जगासमोर नवी मानके देखील प्रस्थापित केली. केवळ काही दिवसांपूर्वीच, भारताने कोरोना लसीच्या 200 कोटी मात्रा देण्याचा विक्रम नोंदवला आहे. या संपूर्ण लढाईत भारतीय जनतेने दाखवलेला संयम, धैर्य आणि सहकार्य हे समाज म्हणून आपल्या वाढत्या सामर्थ्याचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. या कठीण परिस्थितीत भारताने केवळ स्वतःची काळजी घेतली नाही तर जगाला देखील मदत केली. कोरोना महामारीने निर्माण केलेल्या वातावरणात आज, जग भारताकडे नव्या विश्वासाने पाहत आहे. जागतिक आर्थिक स्थैर्य, पुरवठा साखळीतील सुलभता आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताकडून मोठ्या आशा आहेत. येत्या काही महिन्यात भारत आपल्या अध्यक्षतेखाली G-20 गटाचं यजमानपद देखील भूषविणार आहे. या गटात जगातले वीस मोठे देश भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक मुद्द्यांवर विचारमंथन करतील. मला खात्री आहे की भारतातील या विचारमंथनामधून निघणारे निष्कर्ष आणि धोरणे आगामी दशकांची दिशा ठरवतील.

महिला आणि सज्जन हो,

काही दशकांपूर्वी मला रायरंगपूरच्या श्री अरविंदो एकात्मिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. थोड्या दिवसांतच श्री अरविंदो यांची 150 वी जयंती साजरी होणार आहे. शिक्षणाविषयीच्या त्यांच्या विचारांनी मला सतत प्रेरणा दिली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विविध पदांवर काम करताना आणि नंतर राज्यपाल म्हणून काम करताना शैक्षणिक संस्थांच्या कार्यामध्ये मी सक्रिय सहभागी राहिले आहे. देशातल्या युवामंडळींमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास भरपूर आहे, हे मी अगदी जवळून पाहिले आहे. आपले आदरणीय अटलजी म्हणायचे की, ज्यावेळी देशातल्या तरूण वर्गाची प्रगती होत असते, त्यावेळी हे युवक काही फक्त स्वतःचे भाग्य घडवतात असे नाही, तर ते देशाच्या भवितव्यालाही आकार देत असतात. ही गोष्ट आज प्रत्यक्षात येत आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. प्रत्येक क्षेत्रात पुढचे पाऊल टाकताना ‘व्होकल फॉर लोकल’ पासून ‘डिजिटल इंडिया’ पर्यंत भारत जगाच्या बरोबरीने मार्गक्रमण करीत आहे त्याचबरोबर औद्योगिक क्रांती -‘फोर पॉइंट ओ’ साठी सिद्ध आहे. भारतातल्या युवकांनी विक्रमी संख्येने स्टार्ट-अप निर्माण केले आहेत, अनेक नवसंकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. आणि अगदी दूर-दुर्गम भागामध्येही डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यामध्ये आपल्या देशातल्या तरूणांचा मोठा सहभाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी घेतलेले निर्णय आणि निश्चित केलेली धोरणे यामुळे देशामध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे. माझ्या सर्व भगिनी आणि कन्यांनी अधिकाधिक सक्षम व्हावे, जेणेकरून राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले जास्तीत जास्त योगदान देता यावे, अशी माझी इच्छा आहे. आपल्या देशातल्या युवामंडळींना मी सांगू इच्छिते की, तुम्ही केवळ आपले भविष्य घडवित नाहीत, तर भविष्यातल्या भारताचा पाया रचत आहात. देशाची राष्ट्रपती या नात्याने मी, आपल्याला नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करेन.

president2

महिला आणि सज्जन हो,

विकास आणि प्रगती म्हणजे निरंतर पुढे जाणे, परंतु त्याचसोबत आपल्या भूतकाळाविषयी जागरूक असणेही तितकेच महत्वाचे आहे. आज ज्यावेळी जगात सर्वत्र शाश्वत वसुंधरेबद्दल चर्चा होते, त्यावेळी भारताच्‍या प्राचीन परंपरा आणि शाश्वत जीवनशैली यांना अधिक महत्त्व येते. हजारो वर्षापासून निसर्गाबरोबर एकोप्याने राहणा-या आदिवासी परंपरांचे पालन करणा-या समाजात माझा जन्म झाला. जंगल आणि जलाशय यांचे किती महत्व आहे, याची जाणीव मला माझ्या आयुष्यात झाली. आम्ही निसर्गाकडून आवश्यक असणारी संसाधने घेतो आणि तितक्याच श्रद्धेने निसर्गाची सेवा करतो. अशी संवेदनशीलता आज जागतिक अत्यावश्यकता बनली आहे. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये भारत जगाला मार्गदर्शन करीत आहे, याचा मला आनंद वाटतो.

महिला आणि सज्जन हो,

माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये लोकसेवेतूनच मला जीवनाचा खरा अर्थ समजला. श्री जगन्नाथ क्षेत्राचे प्रसिद्ध कवी भीम भोई जी, यांच्या काव्यामध्ये एक पंक्ती आहे – “मो जीवन पछे नर्के पड़ी थाउ, जगत उद्धार हेउ”। या पंक्तीचा अर्थ असा आहे की, जगाच्या कल्याणासाठी काम करणे हे स्वतःच्या हितापेक्षा कितीतरी मोठे काम आहे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, तो सार्थ ठरविण्यासाठी मी संपूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने, जगाच्या कल्याणाच्या भावनेने, कार्य करण्यास सदैव तत्पर आहे. एक गौरवशाली आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन कर्तव्याच्या मार्गावर समर्पणाच्या भावनेने पुढे जाऊ या.

धन्यवाद !

जय हिंद !!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.