ड्राईव्ह इन लसीकरण हे गरीबांसाठी नव्हे तर श्रीमंतासाठीच… समाजवादी पक्षाचा आरोप

प्रशासन फक्त श्रीमंतांचा विचार करत असून, त्यामुळेच त्यांनी ड्राईव्ह इन लसीकरण संकल्पनेला अधिक गती देण्याचा प्रयत्न केल्याचेही रईस शेख यांनी म्हटले आहे.

151

मुंबईमध्ये सध्या ज्याप्रकारे ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे, त्यावरुन महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे. ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र हे केवळ धनदांडग्यांसाठीच सुरू केले जात असल्याचा आरोप, समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी केला आहे. तसेच कोविन पोर्टलवर आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी केलेल्यांनाच लस देण्याच्या निर्णयाचाही त्यांनी विरोध करत झोपडपट्टयांमधील गरीबांचा विचार प्रशासन करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गरीबाने लसीरकण करायचे नाही का?

लसीकरणाच्या मुद्यावरुन रईस शेख यांनी ट्विटरवरुनच प्रशासनाला आणि राज्य सरकारला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड हे पुरेसे नाही. तर त्यासाठी आपल्याकडे स्वत:चे वाहन आणि उच्च क्षमतेची इंटरनेट सुविधाही तेवढीच महत्वाची आहे. तरच आपण सकाळी केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतो, अशा शेलक्या शब्दांत शेख यांनी प्रशासनाचा समाचार घेतला आहे. आज ज्यांच्याकडे वाहने आहेत, त्यांच्यासाठी महापालिका प्रशासन हे राज्यातील सरकारच्या निर्देशानुसार, ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करत आहे. परंतु या केंद्रांमध्ये फक्त श्रीमंत तथा धनदांडगेच जाऊ शकतात. पण झोपडपट्टीतील गोरगरीब जनतेने लसीकरणासाठी कसे जायचे. ना त्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे, ना हाय स्पीडचे इंटरनेट. आज स्मार्ट फोन असला तरी इंटरनेट सुविधा चांगल्या क्षमतेने नसल्यास, त्यांची नोंदणी होऊ शकत नाही. मग त्या गरीबाने लसीरकण करायचे नाही का, असा सवाल रईस शेख यांनी केला आहे.

(हेही वाचाः ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाच्या उद्घाटनात महापौर ‘आऊट’!)

प्रशासन करते फक्त श्रीमंतांचा विचार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसारच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार हाकत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या मुद्यावरुन शेख यांनी अप्रत्यक्ष सरकारलाही टार्गेट केले आहे. लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन लोकांनी गर्दी करण्यापेक्षा, जर घरोघरी जाऊन लसीकरण केले तर सर्वांना याचा लाभ मिळू शकतो. परंतु प्रशासन फक्त श्रीमंतांचा विचार करत असून, त्यामुळेच त्यांनी ड्राईव्ह इन लसीकरण संकल्पनेला अधिक गती देण्याचा प्रयत्न केल्याचेही शेख यांनी म्हटले आहे.

इतके झाले लसीकरण

मुंबईत दादरमध्ये पहिले ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्नसह १४ मोकळ्या जागांवर ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. रविवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २७ लाख ४३१ जणांचे लसीकरण पार पडले. यामध्ये २० लाख ५२ हजार ९६३ जणांनी पहिला डोस, तर ६ लाख ४७ हजार ४६८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील २४ हजार ९०३ व्यक्तींचे लसीकरण पार पडले आहे.

(हेही वाचाः वानखेडे, ब्रेबॉर्नवर होणार ड्राईव्ह ईन लसीकरण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.