दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीरमधील (Srinagar) डीएसपी आदिल मुश्ताक याला निलंबित केले आहे. आता त्याला अटक करण्यात आली आहे. शेख आदिलने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी मुझामिल जहूरकडून 5 लाख रुपयांची लाच घेतली होती, असा आरोप आहे. डीएसपी आदिल हा मुझामिलच्या सतत संपर्कात होता.
टेरर फंडिंग प्रकरणात मुझामिलला वाचवण्यासाठी तो सतत प्रयत्न करत होता. पोलिसांना टेलिग्राम अॅपवरील चॅट आणि आदिल आणि मुझमिल यांच्यातील सुमारे 40 फोन कॉलचे रेकॉर्डदेखील सापडले आहेत. शेख आदिलविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार श्रीनगरमधील (Srinagar) नौगाम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खोटे पुरावे देणे आणि पुरावे नष्ट करणे यांचाही समावेश आहे.
हेही पहा –
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तिन्ही दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान मुझमिल जहूरचे नाव उघड झाले होते. तपासादरम्यान डीएसपी आदिल आणि मुझमिल जहूर यांच्यातील संपर्क उघड झाला. डीएसपी आदिल याला मार्चमध्ये निलंबित करण्यात आले होते. पोलीस मुझमिलचा शोध घेत होते. दरम्यान, जुलैमध्ये त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता डीसीपी आदिल याला अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community